Headlines

आढेगावच्या यात्रेला वादाचे गालबोट; लक्ष्मण हाकेंच्या उपस्थितीत झटापट:पोखरापूरच्या परज सोहळ्यानंतर आढेगावात घडला प्रकार, दोषींवर कारवाईची मागणी



पोखरापूर व आढेगाव येथे दीपावली पाडव्यानिमित्त आयोजित श्री. विठ्ठल बिरुदेव यात्रेदरम्यान आढेगाव येथे झटापटीचा प्रकार घडल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. ओबीसी नेते लक्ष्मण हाके आणि समाधान पाटील यांच्या उपस्थितीत घडलेल्या या प्रकारामुळे यात

.

मोहोळ तालुक्यातील पोखरापूर येथे मंगळवार, दि. १० नोव्हेंबर रोजी दीपावली पाडव्याच्या निमित्ताने श्री. विठ्ठल बिरुदेव यात्रेच्या पारंपरिक परज सोहळ्यास सायंकाळी पाचच्या सुमारास प्रारंभ झाला. या कार्यक्रमात ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्यासह समाधान पाटील सहभागी झाले होते. भाकणूक कार्यक्रमानंतर हाके हे जवळच असलेल्या आढेगाव येथील श्री. विठ्ठल बिरुदेव मंदिरात दर्शनासाठी गेले होते. यावेळी देवस्थान समितीच्या वतीने त्यांच्या आगमनाचे स्वागत करून त्यांना सन्मानासाठी निमंत्रित करण्यात आले होते.

दरम्यान, हाके यांच्या पाठीमागून येणाऱ्या एका अनोळखी व्यक्तीने अपशब्द वापरल्याचा संशय समाधान पाटील यांनी व्यक्त केला. समोर भगवे उपरणे घालून सन्मानासाठी उभ्या असलेल्या कार्यकर्त्यांनीच हा प्रकार घडवून आणल्याचा संशय घेत त्यांनी संबंधित कार्यकर्त्यांवर हात उचलल्याचा आरोप करण्यात आला आहे. देवस्थान समितीच्या वतीने यात्रेच्या पार्श्वभूमीवर सर्वांना शांतता राखण्याचे आवाहन केले जात असतानाच जमावात झटापट झाली. त्यामुळे काही काळ परिस्थिती तणावपूर्ण बनली होती. मात्र, अल्पावधीतच परिस्थिती नियंत्रणात आली. दरम्यान, काही महिन्यांपूर्वी मोहोळ येथील निसर्ग हॉटेलमध्ये लातूर येथील काही युवक जेवणासाठी थांबले असताना योगायोगाने ओबीसी नेते लक्ष्मण हाके हेही तेथे आले होते. यावेळी संबंधित युवकांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर हाके यांच्याशी हस्तांदोलन करत गरीब मराठ्यांना आरक्षण मिळू द्या, असा सवाल केला होता. त्यानंतर हाके यांच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक होत संबंधित युवकांना मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला होता. या प्रकरणी संबंधित युवकांविरुद्धच गुन्हा दाखल करण्यात आल्याचे सांगण्यात येते.

मग आम्ही फिरायचेच नाही का? ^पोखरापूर येथील बिरोबा यात्रेत आम्ही सहभागी झालो होतो. तेथून जवळच असलेल्या आढेगाव येथील बिरोबाच्या दर्शनासाठी आम्ही गेलो होतो. त्यावेळी पुजाऱ्यांच्या आग्रहास्तव आम्ही सत्कार स्वीकारत होतो. दरम्यान, काही तरुणांनी आमच्या अंगावर धावून येण्याचा प्रयत्न केला. आमच्यासोबत कार्यकर्तेही होते. त्यांच्यात बाचाबाची झाली. महाराष्ट्रातील वातावरण निवळत असताना अशा घटना घडत आहेत. आम्ही फिरत असताना आमच्यावर हल्ले होतात. मग आम्ही फिरायचेच नाही का? – लक्ष्मण हाके, ओबीसी नेते

दोषींवर निष्पक्ष कारवाई करण्याची मागणी धार्मिक यात्रा, उत्सव आणि सामाजिक कार्यक्रम हे एकात्मता व बंधुभावाचे प्रतीक असतात. अशा पवित्र ठिकाणी वैयक्तिक वाद किंवा सामाजिक तेढ निर्माण करणाऱ्या कृतींना थारा मिळणे योग्य नाही. त्यामुळे निसर्ग हॉटेल आणि आढेगाव येथील दोन्ही घटनांची वस्तुनिष्ठ तपासणी करून सीसीटीव्ही फुटेज व उपलब्ध पुराव्यांच्या आधारे दोषींवर निष्पक्ष कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे. सामाजिक सलोखा टिकविण्यासाठी कायद्याची अंमलबजावणी निष्पक्ष असणे जितके आवश्यक आहे, तितकेच धार्मिक व सार्वजनिक ठिकाणी सर्वांनी संयम राखणेही गरजेचे आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *