![]()
काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांच्या पुस्तकावर शिवसेना शिंदे गटाच्या नेत्यांकडून आक्षेप घेण्यात आला आहे. या पुस्तकात सावरकरांच्या संदर्भात आक्षेपार्ह उल्लेख असल्याचा दावा शिंदे गटाकडून करण्यात आला आहे. पत्रकार परिषद घेत शिंदे गटाच्या नेत्यांनी हे पुस्तक फाडले. हे पुस्तक फाडत असताना शायना एनसी यांच्याकडून माणिशंकर अय्यर यांचा फोटो फाडताना चुकून स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचा देखील एक फोटो फाडण्यात आला. यावरून आता शिवसेना ठाकरे गटाकडून संताप व्यक्त केला जाता आहे. याचसोबत कॉंग्रेसनेही या गोष्टीचा निषेध नोंदवला आहे. प्रदेश काँग्रेस कमिटीचे वरिष्ठ प्रवक्ते गोपाळ तिवारी यांनी म्हटले की, अमित शहा प्रस्थापित शिंदे सेनेच्या नेत्या शायना एनसी, ज्या या मूळ भाजपच्या आहेत हे सर्वांना माहीत आहे. त्यांनी आज त्या ठिकाणी सोनियाजींच्या पुस्तकाविषयी काही आक्षेप घेण्याच्या दृष्टीने जी पत्रकार परिषद घेतली, त्यामध्ये अत्यंत बेदरकारपणे, असंवेदनशीलपणे, अत्यंत निष्काळजी व बेपर्वाईने हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो फाडला. फोटो फाडला, त्याच्यानंतर जेव्हा लक्षात आले तेव्हा देखील हसतायत. म्हणजे ही तर अत्यंत शरमेची गोष्ट आहे. पुढे गोपाळ तिवारी म्हणाले की, त्या ठिकाणी जे काही बसलेले नेते आहेत हे पूर्वाश्रमीचे इतर पक्षातले आहेत आणि आज शिंदे सेनेमध्ये ते भारतीय जनता पक्षाचा अजेंडा पूर्ण करायला चालले आहेत, हे खेदाने सांगावे लागते. म्हणजे वंदनीय बाळासाहेब ठाकरेंच्या विषयी आदर असण्याऐवजी गांधी कुटुंबीयांविषयी द्वेष, मत्सर व्यक्त करण्याकरता त्या ठिकाणी निश्चितपणे गेलेले आहेत. अन्यथा असा अपराध घडला नसता. वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांनी तत्कालीन पंतप्रधान इंदिराजी गांधी यांनी ज्या परिस्थितीमध्ये देशात आणीबाणी लावली, त्या परिस्थितीचे मार्मिक मधून खुले समर्थन केले होते. आणि त्यांनी स्पष्ट सांगितले होते की इंदिराजींना ही आणीबाणी लावण्यावाचून दुसरा पर्याय नाहीये देशापुढे. जर देश वाचवायचा असेल तर हे आणीबाणी लावणे हे योग्य आहे. याचे खुले समर्थन वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांनी केले होते आणि हेच भाजपला वारंवार सलत आहे, असेही गोपाळ तिवारी यांनी म्हटले. तसेच हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने या महाराष्ट्रात मिळणारी मतं घ्यायची, त्या जागा घ्यायच्या, ते आमदार घ्यायचे; परंतु बाळासाहेब ठाकरेंनी आणीबाणीचे समर्थन केले याचा मात्र मनात राग असल्याने, आपलेच नेते शिंदे सेनेत घुसवून अशा पद्धतीने बाळासाहेब ठाकरेंचा उपमर्द आणि अपमान करायचा, याचा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस तीव्र धिक्कार आणि निषेध करतो, अशा शब्दांत गोपाळ तिवारी यांनी आपला निषेध नोंदवला आहे.
Source link
बाळासाहेबांचा फोटो फाडल्यावरून काँग्रेसचाही हल्लाबोल:फोटो फाडल्याचे लक्षात आल्यानंतरही हसणे ही अत्यंत शरमेची गोष्ट- गोपाळ तिवारी