![]()
सिडको परिसरातील एमजीएम महाविद्यालयाच्या गंगा वसतिगृहातील तिसऱ्या मजल्यावरील खोलीत फिजिओथेरपीच्या प्रथम वर्षात शिकणाऱ्या २० वर्षांच्या विद्यार्थिनीचा गुरुवारी (२६ नोव्हेंबर) दुपारी चार वाजेच्या सुमारास गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला. निकिता
.
निकिताने याच वर्षी महाविद्यालयात फिजिओथेरपीच्या पदवी अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला होता आणि ती वसतिगृहाच्या तिसऱ्या मजल्यावर तिच्याच अभ्यासक्रमातील दोन मैत्रिणींसोबत राहत होती. गुरुवारी सकाळी ७.३० वाजताच्या सुमारास ती उठली, मात्र महाविद्यालयात जाण्यास नकार देत खोलीतच थांबली. तिच्या दोन्ही रूममेट्स महाविद्यालयात गेल्या आणि सायंकाळी ४.३० वाजता परतल्या असता खोलीचा दरवाजा आतून बंद असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. वारंवार हाक मारूनही निकिताने कोणताही प्रतिसाद दिला नाही. या वेळी मागचा दरवाजा उघडा असल्याचे दिसल्याने त्यांनी खोलीत प्रवेश केला असता, निकिता गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आली. तिला तात्काळ खाली उतरवून रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी तिला तपासून मृत घोषित केले.
सिडको पोलिसांनी याप्रकरणी संशयास्पद मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे. प्राथमिक तपासात हा आत्महत्येचा प्रकार संशयास्पद असला, तरी शुक्रवारी होणाऱ्या शवविच्छेदन अहवालानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल, असे पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले.
संस्थेच्या मुलींच्या वसतिगृहात फिजिओथेरपीचे शिक्षण घेणाऱ्या एका विद्यार्थिनीने गळफास घेतल्याची माहिती मिळाली. यानंतर तात्काळ डॉक्टरांना घटनास्थळी बोलावण्यात आले. डॉक्टरांनी तपासणी केली असता विद्यार्थिनीची नाडी सुरू नसल्याचे आढळले. दरम्यान, पोलिसही घटनास्थळी दाखल झाले होते. पोलिसांनी संबंधित विद्यार्थिनीला पुढील वैद्यकीय प्रक्रियेसाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (घाटी) येथे नेले. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस करीत असून एमजीएम प्रशासनाकडून तपास यंत्रणांना पूर्ण सहकार्य केले जात आहे. अशी माहिती एमजीएम प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
कोणतीही सुसाइड नोट आढळली नाही
हा प्रकार कशामुळे आणि का घडला, निकिताने आत्महत्या केली की, तिच्यासोबत काही घातपात या अंगाने पोलिस तपास करत आहेत. दरम्यान, तिच्या रुमची तपासणी केली असता तेथे कुठल्याही प्रकारची सुसाइड नोट आढळली नाही, परंतु पोलिसांनी तिचा मोबाइल ताब्यात घेतला आहे.