“गृहराज्यमंत्री योगेश कदम म्हणतात की मी कोणाची तरी सुपारी घेऊन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना बदनाम करत आहे; पण योगेश कदमजी, सुपाऱ्या तुम्ही घ्यायला लागलात, आम्ही नाही! मंत्रिपद मिळाल्यापासून तुम्हीच मराठ्यांचे लोक फोडून मराठ्यांविरोधात उभे करत आहात
.
तसेच, “जरांगे पाटील खोटं बोलतात, ऑडिओ क्लिप आमच्याकडे दुसऱ्या दिवशी आली,” असा दावा करणाऱ्या ज्येष्ठ नेते रामदास कदम यांनाही जरांगे पाटलांनी थेट आव्हान दिले. रामदास कदम यांच्याकडे माझ्या पत्रकार परिषदेच्या 2 दिवस आधीच ती क्लिप आली होती आणि त्यांनी कांदिवलीतून ‘जोशी’ नामक व्यक्तीला फोन करून शिंदे साहेबांसाठी क्लिप पाठवू का अशी विचारणा केली होती, असा खळबळजनक गौप्यस्फोट करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या सर्वांचे कॉल डिटेल्स (CDR) काढावेत, अशी मागणीही जरांगे पाटील यांनी केली.
मंत्रिपद मराठ्यांची प्रमाणपत्रे रद्द करण्यासाठी दिले का?
राज्यमंत्री योगेश कदम यांनी केलेल्या आरोपांचा समाचार घेताना मनोज जरांगे पाटील यांनी त्यांना ‘कदमजी’ म्हणत खडेबोल सुनावले. “आम्हाला एकनाथ शिंदे यांना बदनाम करायचे असते, तर गरीब मराठ्यांनी जीवाचे रान करून त्यांना एवढ्या उंचीवर नेले नसते. मात्र, मंत्रिपद हातात आल्यापासून तुम्हीच स्वतःच्या जातीचे नुकसान करायला निघाला आहात. मराठा समाजाची प्रमाणपत्रे रद्द करणे, तरुणांवर एमपीडीए (MPDA) व खोटे गुन्हे दाखल करणे, आमचे समन्वयक फोडून त्यांना पत्रकार परिषदा घ्यायला लावणे, असे प्रकार तुमच्याकडून सुरू आहेत.”

मंत्री व आमदारांमुळेच एकनाथ शिंदेंचा आलेख घसरणार
शिंदे साहेबांचे काही मंत्री, आमदार आणि प्रवक्ते त्यांना चुकीचे मार्गदर्शन करून त्यांच्याच पायावर धोंडा पाडत आहेत. ज्याप्रमाणे 2019 मध्ये फटका बसला होता, तसेच उद्या एकनाथ शिंदे यांना खाली मान घालायची वेळ आली, तर त्याला आम्ही मराठे नव्हे तर तुम्हीच मंत्री आणि आमदार जबाबदार असाल, असा इशाराही जरांगे पाटलांनी दिला.
माझ्या पत्रकार परिषदेच्या 2 दिवस आधीच क्लिप आली होती
ऑडिओ क्लिप प्रकरणावरून रामदास कदम यांनी केलेल्या टीकेवर मनोज जरांगे पाटील यांनी अत्यंत महत्त्वाचा आणि नवीन तपशील उघड केला. रामदास कदम म्हणतात की, मी पत्रकार परिषद घेतल्याच्या दुसऱ्या दिवशी त्यांच्याकडे ऑडिओ क्लिप आली आणि मी रेटून खोटं बोलतो. मात्र, माझ्याकडे ठोस पुरावे आहेत की, रामदास कदम यांच्या कांदिवली येथील घरी किंवा कार्यालयात माझ्या पत्रकार परिषदेच्या 2 दिवस आधीच ही क्लिप पोहोचली होती. त्यावेळी रामदास कदम यांनी एकनाथ शिंदे यांचे अत्यंत विश्वासू असलेल्या ‘जोशी’ नामक व्यक्तीला फोन करून “शिंदे साहेबांना ही क्लिप पाहिजे का, मी पाठवतो” असे विचारले; त्यावर समोरून जोशी यांनी “आमच्याकडे ही क्लिप कालच आली आहे” असे उत्तर दिले.
दुसऱ्या दिवशी क्लिप आली तर फोन करण्याची गरज काय होती?
जर रामदास कदम यांच्या म्हणण्यानुसार माझ्या पत्रकार परिषदेनंतर दुसऱ्या दिवशी क्लिप आली असेल, तर ती क्लिप तोपर्यंत सर्व टीव्ही चॅनेलवरून संपूर्ण महाराष्ट्रात आणि देशात पोहोचली होती. मग दुसऱ्या दिवशी टीव्हीवर बातम्या सुरू असताना रामदास कदम यांना जोशी नामक व्यक्तीला फोन करून “शिंदे साहेबांना ही क्लिप दाखव” असे सांगण्याची गरजच काय होती, असा सवाल जरांगे पाटलांनी उपस्थित केला.
क्लिप देणारा व्यक्ती एकच असल्याचा संशय
20 तारखेच्या दसरा मेळाव्यात मी हा विषय मांडल्यानंतर मुंबईतील एकाच व्यक्तीने मला आणि रामदास कदम यांना ही क्लिप दिल्याची दाट शक्यता आहे; याबाबतची माहिती मला खुद्द शिंदे साहेब आणि रामदास कदम यांच्या अत्यंत जवळच्या बड्या नेत्यांनीच दिली असल्याचेही जरांगे म्हणाले.
फडणवीसांनी कॉल डिटेल्स काढावेत
या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी करत जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना थेट साद घातली. हे कोडे अत्यंत गंभीर असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याला हलक्यात घेऊ नये. फडणवीस साहेबांनी तात्काळ रामदास कदम आणि जोशी नामक व्यक्तीचे कॉल डिटेल्स काढावेत; म्हणजे क्लिप कोणी कोणाला आणि कधी दिली, याचे सर्व धागेदोरे उघड होतील.
शिंदे साहेब आणि श्रीकांत शिंदेंचे डोळे उघडतील
दसरा मेळाव्यात मी 500 कोटी रुपयांचा विषय मांडला होता, त्यावरही शिंदे साहेबांनी पुरावे असतील तर द्या असे म्हटले होते. आजही माझे आव्हान आहे की, रामदास कदम यांनी जाहीर करावे की त्यांनी जोशी नामक व्यक्तीला फोन केला नव्हता, आणि एकनाथ शिंदे यांनी मला सांगावे की पुरावे असतील तर द्या; मी तात्काळ पत्रकार परिषद घेऊन सर्व पुरावे जनतेसमोर ठेवायला तयार आहे. मी हे पुरावे टाकले, तर रामदास कदम यांच्या घरातील कोणी ही माहिती बाहेर फोडली याचा त्यांना धक्का बसेल आणि एकनाथ शिंदे व खासदार श्रीकांत शिंदे यांचेही डोळे उघडतील की आपले खरे हितचिंतक कोण आणि आपल्या पाठीत खंजीर खुपसणारे कोण आहेत.
3 वर्षे रक्त आटवून आरक्षण मिळवले, तुम्ही मेहेरबानी केली नाही
मराठा आरक्षणाच्या लढ्याची आठवण करून देत मनोज जरांगे पाटील यांनी सत्ताधारी नेत्यांना खडसावले. गेली 70 ते 75 वर्षे आपल्याच काही मराठा नेत्यांनी गरीब मराठ्यांचे वाटोळे केले आहे. तुम्ही मंत्रिपदावर बसल्याबरोबर आम्हाला आरक्षण दिलेले नाही; त्यासाठी आम्ही 3 वर्षे जीवाचे रान केले, मराठा समाजाने रक्त सांडले, तेव्हा कुठे आरक्षण मिळाले. आम्ही मोठ्या मनाने तुमचे कौतुक केले होते; पण आज तुम्ही सत्तेसाठी आणि नेत्यांसाठी गरीब मराठ्यांशी भांडत आहात, तर मी माझ्या समाजाच्या हक्कासाठी सत्तेशी भांडत आहे. तुम्ही कितीही खोलात जाण्याचा प्रयत्न केला, तरी मी त्याहून अधिक खोलात जाऊन तुमचे सर्व षड्यंत्र उधळून लावीन, असा सज्जड इशाराही मनोज जरांगे पाटील यांनी दिला.
—————————————————–
हेही वाचा…
मनोज जरांगे पाटलांची दिशा भरकटली: ते कोणाची तरी ‘सुपारी’ घेऊन एकनाथ शिंदेंना बदनाम करतायत; राज्यमंत्री योगेश कदम यांचा हल्लाबोल

“मराठा आरक्षणाच्या आंदोलनातून पुढे आलेले मनोज जरांगे पाटील यांची दिशा आता पूर्णपणे भरकटली असून, ते कोणाची तरी ‘सुपारी’ घेऊन काम करत आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना चुकीच्या पद्धतीने लक्ष्य करून बदनाम करण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू आहे; मात्र हा प्रयत्न कधीही यशस्वी होणार नाही,” असा गंभीर आरोप गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी शुक्रवारी (27 नोव्हेंबर) माध्यमांशी संवाद साधताना केला आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी
नेते-कार्यकर्त्यांनी जनतेत दिसावे, होर्डिंग्जवर नाही: पुण्यातील फ्लेक्स काढा मोहिमेचे मुख्यमंत्र्यांकडून कौतुक; नागपूर अधिवेशनासाठीही दिले कडक निर्देश

पुण्यातील अतिक्रमण आणि अनधिकृत फ्लेक्सबाजीविरोधात पुणे महानगरपालिकेने सुरू केलेल्या अभिनव ‘भाऊ फ्लेक्स काढा’ या मोहिमेची दखल थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली असून त्यांनी महापालिका प्रशासनाचे मनापासून अभिनंदन केले आहे. विशेष म्हणजे, या मोहिमेत खुद्द भाजपच्या महापौर मंजुषा नागपुरे, स्थायी समिती अध्यक्ष श्रीनाथ भिमाले आणि नगरसेवकांनाही घरचा आहेर मिळालेला असतानाच, मुख्यमंत्र्यांनी या कारवाईचे जोरदार समर्थन केले आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी