![]()
खुनाच्या गुन्ह्यात जन्मठेपेची शिक्षा भोगत असताना संचित रजेवर बाहेर आल्यानंतर फरार झालेल्या आरोपीला वारजे माळवाडी पोलिसांनी अटक केली आहे. सुंदर ऊर्फ विलास सतीश गवळी (वय २८, रा. वडगाव देव, ता. तुळजापूर, जि. धाराशिव) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. गवळी याच्याविरुद्ध २०२० मध्ये नळदुर्ग पोलीस ठाण्यात भारतीय दंड विधानातील कलम ३०२ (खून) आणि ३०७ (खुनाचा प्रयत्न) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती. छत्रपती संभाजीनगर मध्यवर्ती कारागृहात तो ही शिक्षा भोगत होता. संचित रजेवर बाहेर आल्यानंतर तो फरार झाला होता, त्यामुळे त्याच्याविरुद्ध नळदुर्ग पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम २६२ अंतर्गत स्वतंत्र गुन्हा नोंदवण्यात आला होता. वारजे माळवाडी पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक सचिन तरडे यांना आरोपी कर्वेनगर परिसरात येणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. ही माहिती त्यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश बोळकोटगी यांना दिली. त्यानंतर उपनिरीक्षक तरडे आणि पोलीस हवालदार भुजंग इंगळे यांना आरोपीचा शोध घेऊन त्याला ताब्यात घेण्याचे आदेश देण्यात आले. पोलिसांचे पथक आरोपीचा शोध घेत असताना, गवळीला पोलिसांची चाहूल लागली. त्यामुळे त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी तत्काळ पाठलाग करून त्याला पकडले आणि कर्वेनगर पोलीस चौकीत आणले. चौकशीदरम्यान त्याने आपले नाव आणि पत्ता सांगितला. वारजे माळवाडी पोलिसांनी नळदुर्ग पोलीस ठाणे आणि छत्रपती संभाजीनगर मध्यवर्ती कारागृहाशी संपर्क साधून आरोपीची ओळख आणि गुन्ह्याची खात्री केली. या प्रकरणी पुढील कारवाई नळदुर्ग पोलीस करत आहेत. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सचिन तरडे, पोलीस हवालदार भुजंग इंगळे आणि पोलीस शिपाई किशोर नेवसे यांनी ही कारवाई यशस्वी केली.
Source link
जन्मठेपेतील फरार खुनी आरोपी पुण्यात अटक:संचित रजेवर बाहेर आल्यानंतर झाला होता फरार