Headlines

दिलासा:भीमा नदीवरील कोंढार चिंचोली- डिकसळ 55 कोटींच्या पुलाच्या कामाला अखेर वेग




करमाळा तालुक्यातील कोंढार चिंचोली (ता. करमाळा) ते डिकसळ (ता. इंदापूर) दरम्यान भीमा नदीवरील पुलाच्या कामाला अखेर वेग आला असून, अनेक दिवसांपासून रखडलेला हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प मार्गी लागत असल्याने तालुक्याच्या पश्चिम भागातील नागरिकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे. सदर पुलास मंजुरी मिळून जवळपास ४ वर्षांचा कालावधी उलटून गेला होता. मात्र, उजनी जलाशयातील पाणीपातळी कायम उच्च राहिल्यामुळे पुलाच्या बांधकामात अडथळे निर्माण होत होते. त्यामुळे पाणी असतानाही आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून पुलाचे काम पूर्ण करण्यात यावे, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून सातत्याने करण्यात येत होती. या मागणीची दखल घेत सार्वजनिक बांधकाम विभागाने पुलाचा नव्याने आराखडा तयार केला असून त्यानुसार कामास गती देण्यात आली आहे. सध्या उजनी धरणातील पाणीपातळीत घट झाल्याने बांधकामासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झाली असून काम वेगाने सुरू आहे. सदर पुलाच्या बांधकाम प्रकल्पास तत्कालीन आमदार संजयमामा हे विधानसभा सदस्य असताना ५५ कोटी रुपयांची प्रशासकीय मान्यता प्राप्त झाली होती. तथापि, राज्य शासनामध्ये झालेल्या बदलामुळे नव्याने स्थापन झालेल्या शासनाच्या कार्यकाळात या कामास स्थगिती आली. शासनाने सदर स्थगिती आदेश मागे घेतल्यानंतर पुलाच्या बांधकामास पुन्हा प्रारंभ करण्यात आला. उजनी जलाशयातील पाणीपातळीमुळे काही तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या होत्या. या पार्श्वभूमीवर आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करून काम सुरळीतपणे पूर्ण करण्याबाबत विद्यमान आमदार नारायण पाटील, भाजप नेते दिग्विजय बागल तसेच पश्चिम भागातील विविध पक्षाचे पदाधिकारी यांनी शासनस्तरावर पाठपुरावा केला. तसेच करमाळा, भिगवण, बारामती, पुणे मार्गावर शासकीय बस सेवा सुरू होण्यास अनुकूलता निर्माण होऊन विद्यार्थ्यांसह नागरिक, शेतकरी व व्यापाऱ्यांना मोठा फायदा होणार असल्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. करमाळा तालुक्यातील पश्चिम भागातील नागरिकांसाठी हा पूल अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. भिगवण, बारामती तसेच पुणे परिसराशी संपर्क साधण्यासाठी या मार्गाचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. करमाळा, राशीन मार्गे भिगवण व पुणे येथे होणारी वाहतूकही या पुलावर अवलंबून आहे. त्यामुळे पुलाचे काम पूर्ण झाल्यानंतर परिसरातील वाहतूक अधिक सुरक्षित, जलद आणि सोयीची होणार आहे. ^करमाळा तालुक्यातील पश्चिम भागातील महत्त्वाच्या डिकसळ–कोंढारचिंचोली पुलाचे काम सुरू असून ही समाधानाची बाब आहे. हे काम लवकर पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. मात्र, पुलाला जोडणारा टाकळी चौकापर्यंतचा रस्ता अरुंद व खराब अवस्थेत आहे. या मार्गावर मोठी वाहतूक असल्याने रस्त्याचे तातडीने रुंदीकरण करून डांबरीकरण करणे आवश्यक आहे. किरण कवडे, संचालक आदिनाथ कारखाना पुलाच्या कामाला मिळालेल्या गतीमुळे पश्चिम भागातील नागरिकांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. काम दर्जेदार पद्धतीने आणि वेळेत पूर्ण करून हा पूल लवकरात लवकर वाहतुकीसाठी खुला करावा, अशी ग्रामस्थांची मागणी आहे. हा पूल कार्यान्वित झाल्यानंतर करमाळा, इंदापूर तसेच परिसरातील गावांमधील संपर्क अधिक मजबूत होणार आहे. ^डिकसळ–कोंढारचिंचोली पुलाच्या एकूण ९ पिलरपैकी तीन पिलरचे काम पूर्ण झाले असून, आणखी १ पिलरचे काम प्रगतीपथावर आहे. डिकसळ गावाकडील बाजूचे काम सुरू करण्याच्या हालचाली सुरू आहेत. तसेच पाणी पातळीत वाढ झाली तरी काम सुरळीत सुरू राहावे, यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याचे नियोजन करण्यात येत आहे. अभिषेक पवार, उपअभियंता बांधकाम विभाग वाहतुकीसाठी महत्त्वाचा दुवा ठरणार पुलाचे काम सुरू असणे समाधानकारक



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *