![]()
दिवाळीत लक्ष्मीपूजन आणि पाडव्याच्या निमित्ताने फुलांना प्रचंड मागणी असते. यंदा सणाच्या मुख्य दोन दिवसांत अकोला शहरात सुमारे ५०० क्विंटल फुलांची विक्री झाली आहे. यातून तब्बल ७० लाख रुपयांची मोठी उलाढाल नोंदवली गेली, असे शहरातील प्रमुख व्यावसायिकांनी सांगितले. शहरातील ठोक बाजारात फुलांच्या पाच ते सात आडती आहेत. आडतींवर माल कमी आल्यामुळे व्यापाऱ्यांनी उपलब्ध झेंडूची फुले ५० ते ७० रुपये किलोने विकली. दिवाळीच्या दिवशी सकाळी झेंडूचा दर थेट १०० रुपये किलोवर पोहोचला होता. येथील बाजारात आवक कमी राहण्याचे आणखी एक प्रमुख कारण म्हणजे बाहेरील व्यापाऱ्यांची थेट खरेदी. हैदराबाद, नागपूर, अमरावती येथील व्यापाऱ्यांनी थेट शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन फुलांची खरेदी केली. ती वाहनाद्वारे रवाना केली. त्यामुळे स्थानिक आडतींपर्यंत पुरेसा माल पोहोचू शकला नाही. व्यापाऱ्यांच्या मते फुलांची सर्वाधिक मागणी गणपती आणि गौरी उत्सवादरम्यान असते. त्या तुलनेत यंदाचा दिवाळीचा हंगाम बाजारात पुरेसा माल उपलब्ध नसल्याने साधारण स्वरूपाचाच राहिला. विविध फुलांची आवक व उगमस्थान झेंडू : झेंडूची फुले प्रामुख्याने रिसोड व आसपासच्या स्थानिक परिसरातून दोन दिवसांत ३०० क्विंटल आवक झाली. शेतकऱ्यांकडून १५-२० ते २५ रुपये किलोने खरेदी झाली, तर किरकोळ बाजारात दिवाळीच्या दिवशी दर १०० रुपये किलोपर्यंत राहिला. शेवंती: छत्रपती संभाजीनगर भागातून १०० क्विंटल आवक झाली. बाजारात १०० ते १२० रुपये किलोने विक्री झाली. गुलाब: अहमदनगर भागातून दोन दिवसांत ७० क्विंटल आवक झाली. दर २५० ते ३०० रुपये किलोपर्यंत पोहोचला. निशिगंध : अहमदनगर, जालना भागातून दररोज ४५० किलो म्हणजेच दोन दिवसांत ३० क्विंटल आवक झाली. दर १०० ते १४० रुपये किलो दरम्यान राहिला. दिवाळीत आवक कमी ^पावसाअभावी पिकांचे झालेले नुकसान व आवक घटल्यामुळे ऐन सणात फुलांचे भाव गगनाला भिडले. यंदा पावसाअभावी अकोला जिल्ह्यातील झेंडूचे पीक मोठ्या प्रमाणावर खराब झाले. गत २-३ वर्षांत दिवाळीच्या काळात फुलांना अपेक्षित मागणी मिळाली नसल्याने शेतकऱ्यांनी यंदा फुलांची लागवड कमी केली. त्यामुळे यावर्षी दिवाळीत आवक कमी झाली. – सुरेश फुलारी, फुलांचे ठोक व्यापारी, अकोला.
Source link
दिव्य मराठी एक्सक्लुझिव्ह:दिवाळीत 500 क्विंटल फुलांमधून 70 लाखांची उलाढाल, हैदराबाद, नागपूरच्या व्यापाऱ्यांनी पळवला माल; 70 रुपये किलोने विकली झेंडूची फुले