![]()
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात ‘गुगल’च्या सहकार्याने प्राध्यापक आणि प्रशासकीय अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) प्रशिक्षण कार्यशाळा नुकतीच पार पडली. याप्रसंगी बोलताना प्र-कुलगुरू डॉ. पराग काळकर यांनी सांगितले की, विद्यापीठाचे शैक्षणिक व प्रशासकीय काम अधिक अचूक आणि जलद करण्यासाठी ‘एआय’ अत्यंत महत्त्वाचे आहे. डॉ. काळकर यांनी यावेळी घोषणा केली की, विद्यापीठ लवकरच ‘एआय’च्या वापराबाबत विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शक तत्त्वे जाहीर करणार आहे. तसेच, विद्यार्थिनींसाठी सोशल मीडियाच्या सुरक्षित वापरासाठी ‘मेटा’च्या सहकार्याने विशेष कार्यशाळेचे आयोजन केले जाईल. ही प्रशिक्षण कार्यशाळा ‘गुगल’च्या ‘गुगल फॉर एज्युकेशन’ आणि विद्यापीठाच्या अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षामार्फत (आयक्यूएसी) आयोजित करण्यात आली होती. विद्यापीठाच्या भूशास्त्र विभागाच्या सभागृहात झालेल्या या कार्यशाळेचे उद्घाटन डॉ. काळकर यांच्या हस्ते झाले. ‘गुगल’च्या निधी शहा, आरती कुमारन आणि श्रीरंग देशपांडे यांनी दोन सत्रांत उपस्थितांना मार्गदर्शन केले. विद्यापीठाचे ‘आयक्यूएसी’ संचालक डॉ. विनायक जोशी या वेळी उपस्थित होते. डॉ. काळकर यांनी स्पष्ट केले की, विद्यार्थ्यांकडून माहितीच्या मांडणीसाठी ‘एआय’चा वापर वाढत असला तरी, स्वतःच्या नवनिर्मितीसाठी ‘एआय’च्या वापराबाबत काही मार्गदर्शक तत्त्वांची आवश्यकता आहे. या दिशेने विद्यापीठ काम करत आहे. कार्यशाळेच्या पहिल्या सत्रात अध्यापन, परीक्षा आणि अभ्यासासाठी गुगल जेमिनाय (Google Gemini) व जेमिनाय नोटबूक (Gemini Notebook) या संसाधनांचा वापर करण्याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. दुसऱ्या सत्रात विद्यापीठाच्या प्रशासकीय मनुष्यबळाच्या गरजांनुसार डिजिटल प्रक्रियांच्या एकत्रीकरणासंदर्भात ‘एआय’च्या वापराविषयी माहिती देण्यात आली. डॉ. जोशी यांनी प्रास्ताविक केले, तर डॉ. ज्योती यादव आणि डॉ. आकांक्षा काशीकर यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले.
Source link
पुणे विद्यापीठात 'गुगल'च्या सहकार्याने 'एआय' प्रशिक्षण:प्रशासकीय अचूकता आणि शैक्षणिक सुधारणेसाठी 'एआय' महत्त्वाचे- प्र-कुलगुरू डॉ. पराग काळकर