![]()
‘सुदृढ बालक हे केवळ एका कुटुंबाचे यश नसून, समृद्ध आणि सशक्त समाजाचा पाया आहे. त्यामुळे बालकांचे पोषण, माता-बालकांचे आरोग्य आणि अंगणवाडीच्या कार्यात समाजातील प्रत्येक घटकाने सक्रिय सहभाग घेणे आवश्यक आहे,’ असे प्रतिपादन संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या गृहविज्ञान विभागप्रमुख डॉ. वैशाली धनविजय यांनी केले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून निवृत्त अंगणवाडी पर्यवेक्षिका पुष्पा चिखलकर यांची उपस्थिती होती. संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या गृहविज्ञान विभागात आयोजित राष्ट्रीय पोषण माहच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या. ‘हमारी अंगणवाडी, हमारी जिम्मेदारी’ ही यंदाची मुख्य संकल्पना असून, त्यातून अंगणवाडीचे महत्त्व, पोषणविषयक जनजागृती आणि सामुदायिक सहभागाचा संदेश देण्यात आला. बालकांना योग्य पोषण मिळावे, त्यांचा सर्वांगीण विकास व्हावा तसेच माता व बालकांच्या आरोग्याबाबत कुटुंब आणि समाजात जागरूकता निर्माण व्हावी, हा राष्ट्रीय पोषण माहामागील प्रमुख उद्देश असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले. डॉ. धनविजय यांनी राष्ट्रीय पोषण माहाची संकल्पना स्पष्ट करताना बालकांच्या पोषणाची योग्य काळजी घेणे, संतुलित आहाराबाबत जनजागृती करणे, माता व बालकांच्या आरोग्याकडे विशेष लक्ष देणे आणि पोषणविषयक चांगल्या सवयी समाजात रुजविण्याची गरज व्यक्त केली. अंगणवाडीचे कार्य केवळ अंगणवाडी सेविकांपुरते मर्यादित नसून पालक, विद्यार्थी, शिक्षक आणि संपूर्ण समाजाची त्यात जबाबदारी आहे. या सामूहिक सहभागातूनच बालकांच्या आरोग्यपूर्ण विकासाला बळ मिळू शकते, असे त्यांनी सांगितले. यंदाच्या राष्ट्रीय पोषण माहामध्ये आहारातील विविधता, प्रथिनांचे योग्य प्रमाण, ताजे व गरम शिजवलेले अन्न, बालविकासासाठी पोषण, सामुदायिक जबाबदारी तसेच पोषण व आहारासंदर्भातील विविध शासकीय योजनांची माहिती जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्यावर भर दिला जाणार आहे. माता, बालक आणि कुटुंबांच्या आरोग्याबाबत व्यापक जनजागृती निर्माण करण्यासाठी विविध उपक्रम राबवण्यात येणार असल्याचे या वेळी सांगण्यात आले.अंगणवाडी पर्यवेक्षिका चिखलकर यांनी एकात्मिक बाल विकास सेवा (आयसीडीएस) योजनेअंतर्गत राबवण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली. बालकांना देण्यात येणाऱ्या पूरक आहाराचे महत्त्व आणि त्याचे आरोग्यदायी फायदे त्यांनी स्पष्ट केले. तसेच गर्भवती महिला व स्तनदा मातांसाठी शासनामार्फत उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या पोषण योजना, आर्थिक सहाय्य आणि विविध कल्याणकारी कार्यक्रमांची माहिती विद्यार्थ्यांना दिली. विद्यार्थ्यांनी विचारलेल्या विविध प्रश्नांची उत्तरे देत त्यांनी पोषण व्यवस्थापन आणि बालविकासाच्या विविध पैलूंवर मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाला विभागातील प्राध्यापक सुमित गेडाम, रविशा आंबेकर, दिपाली भैसे, शिल्पा इंगोले, आयतल कामदार, विशाखा खांडेकर, अनुश्री आडे तसेच शिक्षकेत्तर कर्मचारी अशोक हिरे, वसंत इंगळे, चरणदास जामठे आणि विद्यार्थी उपस्थित होते. फलक, रांगोळीतून दिला पोषणाचा संदेश राष्ट्रीय पोषण माह निमित्त गृहविज्ञान विभागातील विद्यार्थ्यांनी सर्जनशीलतेतून उद्घाटन फलक तयार केला. त्यावर राष्ट्रीय पोषण माहाची थीम, अंगणवाडीचे महत्त्व, पोषण विषयक संदेश, आरोग्यदायी जीवनशैलीचे विविध पैलू प्रभावीपणे मांडले. विद्यार्थ्यांच्या कल्पकतेतून साकारलेला हा फलक उपस्थितांचे लक्ष वेधून घेणारा ठरला. ‘हमारी अंगणवाडी, हमारी जिम्मेदारी’ या संकल्पनेला अनुसरून विद्यार्थ्यांनी विभागात संदेशपर रांगोळी साकारली. रांगोळी तून बालपोषण, माता-बालकांचे आरोग्य, अंगणवाडीची भूमिका, संतुलित आहाराचे महत्त्व कलात्मक पद्धतीने मांडले. या उपक्रमांमुळे पोषण माहाचा संदेश विद्यार्थ्यांपासून समाजापर्यंत प्रभावीपणे पोहोचवण्यास मदत झाली.
Source link
बालकांचे पोषण करण्याची समाजातील सर्वांची जबाबदारी- डॉ. वैशाली धनविजय:‘हमारी अंगणवाडी, हमारी जिम्मेदारी’ संकल्पनेतून सामुदायिक सहभागावर भर