![]()
पर्यावरण संवर्धनाचीजबाबदारी समाजातील प्रत्येक घटकाने स्वीकारली, तर भावी पिढ्यांना समृद्ध निसर्गाचा वारसा मिळू शकतो, याचा प्रत्यय करमाळा तालुक्यातील खातगाव येथे आला. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, खातगाव क्र. १ येथे गावातील पर्यावरणप्रेमी युवक अक्षय शहाजी धायगुडे यांच्या पुढाकारातून विविध देशी वृक्षांची लागवड करण्यात आली. विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या आजी-आजोबांच्या उपस्थितीत पार पडलेला हा उपक्रम परिसरात कौतुकाचा विषय ठरला. शाळेतील शिक्षकांच्या मागणीनुसार अक्षय धायगुडे यांनी विविध देशी वृक्षांची रोपे शाळेला भेट दिली. त्यानंतर शाळेच्या परिसरात कदंब, बेल, पळस, रातराणी, तगर, मोगरा, बकुळ, रामफळ, सोनचाफा आदींसह एकूण २७ देशी वृक्षांची लागवड करण्यात आली. या वृक्षारोपण उपक्रमात अक्षय धायगुडे, लक्ष्मी धायगुडे, संगीता कोकरे, पद्मावती कोकरे, हरिदास धायगुडे, मोसिम शेख, नितीन कोकरे, वैभव कोकरे आणि निजाम शेख यांनी विद्यार्थ्यांसोबत उत्साहाने सहभाग घेतला. यावेळी शिक्षक उपस्थित होते. “वृक्षारोपण ही केवळ मोहीम नसून भावी पिढीसाठी केलेली अमूल्य गुंतवणूक आहे, हा संदेश या उपक्रमातून देण्यात आला. गावोगावी अशा सामाजिक जाणीव असलेल्या युवकांनी पुढाकार घेतल्यास प्रत्येक शाळा हरित होईल आणि विद्यार्थ्यांमध्ये निसर्गप्रेमाची बीजे रुजतील, अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली. परिस्थितीशी दोन हात करत माळरानावर नंदनवन फुलविण्याचा प्रयत्न केल्याबद्दल करमाळ्याचे गटशिक्षणाधिकारी नितीन कदम, जयवंत नलावडे, मिनीनाथ टकले, केंद्रप्रमुख महावीर गोरे तसेच ग्रामस्थांनी अक्षय धायगुडे आणि शाळेतील शिक्षक बाळासाहेब बोडखे व बिभीषण सातपुते यांचे विशेष कौतुक केले.
Source link
युवकांच्या पुढाकारातून शाळा हरित; 27 वृक्षारोपणाचा प्रेरणादायी उपक्रम:खातगावामधील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत केली लागवड