![]()
वैजापूर तालुक्यातील लासूरगाव येथे शिवना नदीच्या काठावर वसलेल्या श्री देवी दाक्षायणी माता मंदिरात शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त भाविकांची मोठी गर्दी होत आहे.
.
मंगळवारी तिसऱ्या माळेला छत्रपती संभाजीनगरसह परजिल्ह्यांतून आलेल्या भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली. रात्री उशिरापर्यंत दर्शनासाठी भाविकांची रांग कायम होती. नवरात्रोत्सवाच्या तिसऱ्या माळेपर्यंत सुमारे ४१ हजार भाविकांनी दर्शन घेतल्याची माहिती मंदिराचे व्यवस्थापक विष्णू हरिश्चंद्रे यांनी दिली.
नवसाला पावणारी देवी म्हणून दाक्षायणी मातेची मराठवाड्यात ख्याती आहे. भाविक चोळी-पातळ, फुले व पूजेचे साहित्य अर्पण करून मनोकामना पूर्ण होण्यासाठी देवीच्या चरणी नतमस्तक होतात. मंगळवार आणि शुक्रवार हे देवीचे विशेष वार असल्याने या दिवशी दर्शनासाठी गर्दी वाढते. नवरात्रोत्सवाच्या दहा दिवसांत मंदिर परिसर भक्तिमय वातावरणाने भारून जातो.
वैजापूरचे तहसीलदार तथा मंदिराचे पदसिद्ध विश्वस्त सुनील सावंत यांच्या संकल्पनेतून गेल्या चार वर्षांपासून नवरात्र व यात्रा उत्सवात दर्शनरांगेतील भाविक जोडप्याच्या हस्ते आरती करून त्यांचा सन्मान केला जातो. तसेच देवीला अर्पण केलेल्या साड्या, पातळ व चोळ्यांचे दिवाळीत गरीब, आदिवासी आणि गरजू महिलांना मोफत वाटप केले जाते. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शालेय विद्यार्थ्यांना पुस्तके व शैक्षणिक साहित्य वाटप करण्याचाही मानस सावंत यांनी व्यक्त केला आहे.
दर्शनरांगेतील ९ भाविक जोडप्यांना आरतीचा मान लासूरगावातील दाक्षायणी मातेच्या नवरात्रारंभ रविवारपासून पहिल्या दुसऱ्या आणि मंगळवारी तिसऱ्या माळेपर्यंत दररोज दिवसातून तीन वेळा होणाऱ्या देवीच्या आरतीचा दर्शनरांगेतील भाविकांनाच मान देण्यात आला. यामध्ये विविध भागातील नऊ भाविक जोडप्यांच्या हस्ते आरती करण्यात आली. दरम्यान, तहसीलदार सुनील सावंत यांच्या संकल्पनेतून गेल्या चार वर्षांपासून दर्शनरांगेतील भाविकांना आरतीचा मान मिळत असल्याने आरती करणाऱ्या भाविकांकडून या निर्णयाचे स्वागत केले जात आहे.