Headlines

वडिलांकडे उपचारासाठी आलेल्या 'टीबी'च्या रुग्णाने रुजवला सेवेचा वारसा:वडिलांकडे उपचारासाठी आलेल्या 'टीबी'च्या रुग्णाने रुजवला सेवेचा वारसा; पोपटराव पवार-अविनाश पोळांकडून प्रेरणा, वाचा आ. अनुराधा चव्हाणांची थक्क करणारी इनिंग!



वडिलांच्या वैद्यकीय सेवेतून आणि गोरगरिबांच्या उपचाराच्या संस्कारांतून ‘आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो’ ही भावना बालपणापासूनच मनात रुजली. पण मला राजकारण मुळीच आवडत नव्हते आणि त्यात मी कधी पडेल असेही वाटले नव्हते. पती अतुल चव्हाण यांच्या शासकीय नोकरीच्या निमित्ताने पश्चिम महाराष्ट्रातील पोपटराव पवार आणि अविनाश पोळ यांचे समाजकार्य जवळून पाहण्याची संधी मिळाली; ज्यामुळे मराठवाड्यातही असे काम करण्याची प्रेरणा मिळाली आणि समाजकारणाच्या माध्यमातून राजकारणात प्रवेश झाला, असे ‘दैनिक दिव्य मराठी’च्या नवरात्र उत्सव विशेष मुलाखतीमध्ये फुलंब्री मतदारसंघाच्या आमदार अनुराधा चव्हाण यांनी म्हटले आहे. सेवेचा वसा आणि बालपणीचे संस्कार प्रश्न: तुमच्या सामाजिक आणि राजकीय प्रवासाची सुरुवात कशी झाली? आमदार अनुराधा चव्हाण: आमच्या घरात राजकारणात कोणी नसले तरी सामाजिक पार्श्वभूमी आमच्या घरी होती. माझे वडील डॉक्टर होते, पण त्यांनी त्याचा कधी व्यवसाय केला नाही; तर एक सेवा म्हणून सक्षम रुग्णांकडून पैसे घ्यायचे आणि सक्षम नसणाऱ्या रुग्णांवर मोफत इलाज करायचे. कोणाची परिस्थिती नसेल तर त्यांना औषध-गोळ्यांसोबतच जेवण मिळावे यासाठी वडिलांचे प्रयत्न असायचे.एकदा टीबीचा एक रुग्ण वडिलांकडे उपचारासाठी आलेला असताना त्यांच्याकडे चांगल्या अन्नासाठी पैसे नाहीत याची जाणीव झाल्याने वडिलांनी त्यांना आमच्या घरी ठेवून घेतले आणि त्यांच्यावर उपचार केले. तिथूनच ‘आपण काहीतरी समाजाचे देणे लागतो’ ही भावना माझ्या मनात कायम रुजली.” पश्चिम महाराष्ट्रातील सहवासातून राजकारणाची प्रेरणा प्रश्न: राजकारणात येण्याचा विचार कसा आला? आमदार अनुराधा चव्हाण: मला राजकारण मुळात कधी आवडत नव्हते. मी राजकारणात येईल असे मला कधीच वाटले नव्हते आणि तशी राजकीय कौटुंबिक पार्श्वभूमीसुद्धा नव्हती. पण माझे पती अतुल चव्हाण यांच्या बदलीमुळे महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये राहण्याची व तिथला विकास पाहण्याची संधी मला मिळाली. विशेषतः पश्चिम महाराष्ट्रात जेव्हा त्यांची बदली झाली होती, त्यावेळी मला पोपटराव पवार आणि अविनाश पोळ यांचे समाजकार्य जवळून पाहता आले. यातूनच मला समाजकार्यात व राजकारणात येण्याची प्रेरणा मिळाली. पश्चिम महाराष्ट्रातील गावांमध्ये जर असे काम होऊ शकते, तर मराठवाड्यातील आपल्या भागामध्ये असे काम का होऊ नये असा विचार करत मी किनगावमध्ये सामाजिक कामाची सुरुवात केली. २००८ पासून काम करत असताना २०१२ मध्ये गणोरी जिल्हा परिषद सर्कलमधील लोकांनी मला आग्रह केला— ‘तुम्ही निवडणूक लढवली पाहिजे; केवळ किनगावसाठी नाही, तर आजूबाजूच्या गावांसाठी काम केले पाहिजे.’ तेव्हापासून ते सर्व लोक माझ्या पाठीशी उभे राहिले, जसे काही माझी माहेरचीच माणसे आहेत. आम्ही पुण्यामध्ये असताना अतुल चव्हाण यांचा प्रशासकीय अधिकारी म्हणून अजित पवार यांच्याशी संवाद होता. यातून जिल्हा परिषद निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने तिकीट दिले. ही संपूर्ण निवडणूक जनतेनेच हातात घेतली होती आणि मला जवळपास साडेतीन हजार मतांनी निवडून दिले.” जिल्हा परिषद: ग्रामीण राजकारणाची खरी शाळा प्रश्न: जिल्हा परिषदेच्या अनुभवाबद्दल आणि महिला लोकप्रतिनिधी म्हणून काम करताना येणाऱ्या आव्हानांबद्दल काय सांगाल? आमदार अनुराधा चव्हाण: ग्रामीण राजकारणाचा मूळ पाया हा जिल्हा परिषद निवडणूकच म्हणावी लागेल. यातूनच सर्व बारीक-सारीक गोष्टींचा संपूर्ण अभ्यास होत असतो. लोकांच्या समस्या आणि त्या कशा सोडवायच्या हे जाणून घ्यायचे असेल, तर त्यासाठी जिल्हा परिषद हे सर्वात चांगले माध्यम आहे. महिला म्हणून काम करत असताना लहान-सहान अडचणी येतातच. समाजात महिलांकडे त्या तितक्या सक्षम आहेत अशा दृष्टीने पाहिले जात नाही. पुरुषांकडून कितीही चुका झाल्या तरी काही फरक पडत नाही, पण महिलेकडून एक चूक जरी झाली, तरी ‘हे महिलांचे कामच नाही, महिला हे करूच शकत नाहीत’ असे लोक बोलतात. त्यामुळे काम करत असताना खूप काळजीपूर्वक काम करावे लागते. १० कामे केली अन् एखादे काम सुटले, तर केलेल्या कामांपेक्षा लोक न झालेल्या कामाचा बाऊ करतात; यात महिलांना जास्त टार्गेट करण्यात येते. काम करत असताना प्रशासन आणि वरिष्ठ नेते सहकार्यच करतात. आमच्या पक्षात कधीही महिलांना दुय्यम स्थान दिले जात नाही. विरोधकांनी कधी आपल्याला टार्गेट केले या गोष्टीत पडायचे नाही, आपण आपल्या कामातून त्यांना उत्तर द्यायचे; या गोष्टीकडे लक्ष दिले पाहिजे, म्हणजे मतदारसंघासाठी चांगले काम करता येते.” महिला आरक्षण आणि विकसित भारताचे स्वप्न प्रश्न: महिला आरक्षणाचा निर्णय आणि राजकारणातील महिलांचे स्थान यावर तुमचे काय मत आहे? आमदार अनुराधा चव्हाण: २०४७ पर्यंत विकसित भारत व्हावा हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वप्न आहे. त्यामुळे ५० टक्के महिला वर्गाकडे दुर्लक्ष करणे योग्य नाही; त्यांना सत्तेत सोबत घेऊन जाणे गरजेचे असल्याने महिला आरक्षणाचा मुद्दा महत्त्वाचा आहे. मातृशक्तीसाठी घेतलेल्या या निर्णयामुळे नक्कीच चांगला बदल होईल. महिला आरक्षण झाले तर त्याचा मोठा फायदा होईल, कारण सभागृहात जे मुद्दे मांडायचे आहेत ते महिला लोकप्रतिनिधी सक्षमपणे मांडत आहेत.” तरुणींना मोलाचा सल्ला आणि पराभवातून शिकलेला धडा प्रश्न: राजकारणात येऊ इच्छिणाऱ्या तरुणींना काय सांगाल? आमदार अनुराधा चव्हाण: राजकारणात येऊ इच्छिणाऱ्या तरुणींनी जनतेचे प्रश्न समजून घेतले पाहिजेत. त्यांच्या समस्या काय आहेत आणि त्या कशा सोडवायच्या हे शिकून घेतले पाहिजे. त्यांनी राजकारणासाठी स्वतःला वाहून घेतले पाहिजे. तब्बल १२ वर्षे सातत्याने काम केल्यानंतर मला आमदारकीची संधी मिळाली आहे; त्यामुळे येताना हा विचार करूनच तरुणींनी राजकारणात आले पाहिजे. परिवाराने साथ दिल्यामुळेच राजकारण करत असताना आज इतक्या मोठ्या पदावर काम करता येत आहे. २०१४ ची विधानसभा निवडणूक मी लढवली आणि माझा पराभव झाला. पण त्या काळात मला माझा संपूर्ण मतदारसंघ काय आहे ते समजले; जनतेच्या काय समस्या आहेत, गरजा आहेत याचा अभ्यास झाला. मी नवीन असताना अनेकांनी मला साथ दिली. माझ्यापेक्षा जास्त त्यावेळी लोकच नाराज झाले होते. पण त्या काळात मी मतदारसंघात फिरणे बंद केले नाही, कारण राजकारणात सातत्य ठेवणे अतिशय गरजेचे होते. मी कायम जनतेत राहिल्यानेच मला आज ही संधी मिळाली असे म्हणता येईल. विकासकामांची दिशा आणि कटिबद्धता प्रश्न: तुमच्या मतदारसंघातील मुख्य प्रश्न आणि विकासाचे काय व्हिजन आहे? आमदार अनुराधा चव्हाण: माझ्या मतदारसंघात ग्रामीण आणि शहरी दोन्ही भाग येतात. शहरातील भागात सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे मनपाच्या शाळांचा दर्जा वाढवणे, इंग्रजी शाळा सुरू करणे, अंगणवाड्यांची संख्या वाढवणे आणि आरोग्याच्या चांगल्या सुविधा उपलब्ध करून देणे. यासाठी माझे प्रयत्न सुरू आहेत. माझी बहीण माझ्या प्रत्येक निर्णयात पाठीशी उभी असते; तिच्या पाठिंब्यामुळेच मला घर आणि राजकारण या सर्व गोष्टींमध्ये समतोल साधता येतो. माझ्या मतदारसंघात जलसंधारण आणि पाणंद रस्ते हे महत्त्वाचे मुद्दे आहेत. आमच्या मतदारसंघात पश्चिम महाराष्ट्राचे वाहून जाणारे पाणी कसे आणता येईल, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. तसेच सीएम ऑफिसमधून प्रत्येक मागणीचा पाठपुरावा करत ते प्रश्न मार्गी लावले जातात. तसा माझा स्वभाव शांत आहे, पण मतदारसंघाच्या विकासासाठी आणि जनतेच्या हक्कासाठी वेळप्रसंगी ‘चंडीचे रूप’ घेता आले पाहिजे!



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *