![]()
अकोट विधानसभा मतदारसंघातील शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांना भेडसावणाऱ्या वीजपुरवठ्याच्या गंभीर समस्यांची दखल घेत आमदार प्रकाश पाटील भारसाकळे यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले. शेतकऱ्यांना सिंचनासाठी वेळेवर व पुरेशा दाबाने वीज उपलब्ध करावी. जळालेले विद्युत रोहित्र (डीपी) दोन दिवसांच्या आत बदलून द्यावेत. असे कडक निर्देश त्यांनी दिले. अकोट येथील महावितरणच्या विभागीय कार्यालयात मंगळवारी ही महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार पडली. या बैठकीला महावितरणचे कार्यकारी अभियंता कुटे, संबंधित उपअभियंता तसेच सर्व कनिष्ठ अभियंते उपस्थित होते. मतदारसंघातील ग्रामीण भागात शेतीसाठी होणारा अपुरा व अनियमित वीजपुरवठा, वारंवार खंडित होणारी वीज, ट्रान्सफॉर्मरवर पडणारा अतिरिक्त भार, रोहित्र जळाल्यानंतर ते मिळण्यास होणारा विलंब यावर बैठकीत सविस्तर मंथन झाले. पावसातील प्रदीर्घ खंड व अनियमिततेमुळे जमिनीत ओलावा उरलेला नाही. पिकांना जगवण्यासाठी शेतकरी विहिरी व कूपनलिकांच्या पाण्यावर अवलंबून आहेत. मात्र, शेतीसाठीचा वीजपुरवठा वारंवार खंडित होत असल्याने सिंचनाचे संपूर्ण वेळापत्रक कोलमडले आहे. पिकांना गरजेच्या वेळी पाणी न मिळाल्यास शेतकऱ्यांच्या कष्टावर पाणी फिरून मोठे आर्थिक नुकसान होण्याची भीती आहे. ही परिस्थिती लक्षात घेऊन महावितरणने कोणतीही दिरंगाई न करता तत्परतेने काम करावे. अशा सूचना त्यांनी या वेळी अधिकाऱ्यांना केल्या. ग्रामीण भागात रोहित्रावर अतिरिक्त भार येत असल्याने रोहित्र जळण्याचे प्रमाण वाढले आहे. रोहित्र जळाल्यानंतर ते बदलून मिळण्यास अनेक दिवस लागत असल्याने शेकडो एकरातील पिके पाण्याअभावी सुकतात. त्यामुळे ही समस्या प्राधान्याने निकाली काढावी. जळालेले रोहित्र कमाल दोन दिवसांत जागेवर पोहोचवून कार्यान्वित करावे. असे आमदारांनी ठणकावले. वीजपुरवठ्याची समस्या ही निव्वळ प्रशासकीय बाब नाही. हा शेतकऱ्यांच्या जगण्या-मरण्याचा प्रश्न आहे. त्यामुळे अधिकाऱ्यांनी संवेदनशीलतेने काम करावे. असे त्यांनी बजावले. यावर महावितरणच्या अधिकाऱ्यांनी वीजपुरवठा सुरळीत ठेवण्याचे व जळालेली रोहित्र तातडीने उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले. रोहित्रामुळे सिंचन ठप्प; शेतकरी संकटात ग्रामीण भागात रोहित्रांवर क्षमतेपेक्षा जास्त भार आल्यामुळे ती जळण्याचे प्रकार सातत्याने घडत आहेत. एक रोहित्र जळाल्यास त्यावरील डझनभर शेतकऱ्यांचा वीजपुरवठा आठवडा-पंधरवड्यासाठी ठप्प होतो. पिके वाचवण्यासाठी एका एका पाण्याचे मोल असताना महावितरणकडून होणाऱ्या विलंबामुळे पिके करपून शेतकरी कर्जबाजारी होण्याचा धोका वाढतो. त्यामुळे रोहित्रांतील क्षमता वाढवणे आणि दुरुस्तीची गती वाढवणे गरजेचे आहे. या काळात शेतकऱ्यांचा अंत पाहू नका ^कोरड्या दुष्काळात शेतकरी आधीच संकटात सापडला आहे. अशा वेळी वीज खंडित करून किंवा डीपी जळाल्यावर शेतकऱ्यांचे सिंचन अडवणे अत्यंत संतापजनक आहे. शेतकऱ्यांना वीज आणि रोहित्रांसाठी महावितरणच्या कार्यालयांचे उंबरठे झिजवावे लागू नयेत. अधिकाऱ्यांनी गांभीर्य ओळखून दोन दिवसांत रोहित्र उपलब्ध करून द्यावेत, अन्यथा शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आक्रमक भूमिका घेतली जाईल. – प्रकाश पाटील भारसाकळे, आमदार, अकोट विधानसभा मतदारसंघ.
Source link
शेतकऱ्यांना सुरळीत वीजपुरवठा द्या; आ. भारसाकळे यांच्या सुचना:वीज समस्यांवर तातडीने उपाययोजना करण्याच्या दिल्या सुचना