Headlines

सिदोजी नाईकांच्या समाधीचे होणार जतन:विश्रामगडावर ऐतिहासिक वारसा जीर्णोद्धारासाठी शिवप्रेमींची वज्रमूठ




छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेला पट्टा किल्ला अर्थात विश्रामगड! स्वराज्याच्या इतिहासातील महत्त्वपूर्ण घटनांचा साक्षीदार असलेल्या या ऐतिहासिक गडावरील सिदोजी नाईक निंबाळकर यांची समाधी काळाच्या ओघात दुर्लक्षित होत आहे. या समाधीचा जीर्णोद्धार करून ऐतिहासिक वारसा जतन करण्यासाठी शिवराष्ट्र परिवार महाराष्ट्र आणि आधार फाऊंडेशन यांनी पुढाकार घेतला आहे. या उपक्रमाची सुरुवात संगमनेर तालुक्यातील रायतेवाडी येथून करण्यात आली. यावेळी शिवराष्ट्र परिवाराचे अध्यक्ष प्रशांत साळुंखे उपस्थित होते. नाशिक आणि अहिल्यानगर या दोन्ही जिल्ह्यांच्या सीमेवर असलेल्या पट्टा किल्ला (विश्रामगड) येथे सिदोजी नाईक निंबाळकर यांच्या समाधीचे पूजन करण्यात आले. यावेळी इतिहास व्याख्याते भूपाल शेळके यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारून उपस्थितांना शिवकालीन इतिहासाची अनुभूती दिली. सिदोजी नाईक निंबाळकर यांचे वंशज शार्दुल आणि शंतनु निंबाळकर यांनी समाधीचे पूजन केले. यानंतर इतिहास अभ्यासक दीपक कर्पे यांनी या परिसराचा रोमांचकारी इतिहास उपस्थितांसमोर उलगडला. त्यांच्या इतिहास कथनातून या भूमीचे ऐतिहासिक महत्त्व आणि सिदोजी नाईक यांच्या बलिदानाची माहिती उपस्थितांना मिळाली. यावेळी शिवराष्ट्र परिवाराचे अध्यक्ष प्रशांत साळुंखे, दीपकराव कर्पे, डॉ. महादेव अरगडे, संतोष शेळके, सुखदेव इल्हे, भूपाल शेळके, बाळासाहेब आहेर, भाऊसाहेब वैद्य यांच्यासह अनेक शिवप्रेमी व इतिहासप्रेमी उपस्थित होते. शौर्यगाथा जिवंत ठेवण्याचा संकल्प इतिहास केवळ पुस्तकांपुरता मर्यादित न राहता ऐतिहासिक वास्तू आणि समाधीस्थळांच्या माध्यमातून जिवंत राहावा. सिदोजी नाईक निंबाळकर यांचा पराक्रम आणि बलिदान पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचावे, हा समाधीच्या जीर्णोद्धारामागील मुख्य उद्देश आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *