![]()
मुल्हेर येथील उद्धव महाराजांचा पुण्यतिथी रथोत्सव यंदाही उत्साहात पार पडला. रथ ओढण्याचा पहिला मान मुस्लिम बांधवांना देऊन सामाजिक सलोख्याचे अनोखे दर्शन घडविले.
.
मुल्हेर येथील उद्धव महाराज संस्थानच्या उत्सवपरंपरेतील महत्त्वाचा सोहळा असलेला रथोत्सव रविवारी साजरा करण्यात आला. सकाळी ७ वाजता गावातील विविध समाजांतील दाम्पत्यांच्या हस्ते देवघरी रथाचे पूजन करण्यात आले. यावेळी उद्धव महाराजांच्या मुखवट्यासह पादुकांचे पूजन व अभिषेक करण्यात आला. त्यानंतर सकाळी रथ मिरवणुकीला प्रारंभ झाला. दुपारी १ वाजेपर्यंत संपूर्ण गावातून रथाची मिरवणूक काढण्यात आली.
रथ मिरवणुकीनंतर दुपारी भजन व महाआरती झाली. त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. यंदाच्या महाप्रसादाचे मानकरी संजय बत्तीसे व त्यांचा परिवार होते. रात्री ८ वाजेपासून भगवान श्रीकृष्ण व तुळशी विवाहानिमित्त रथ मिरवणूक काढण्यात आली. मिरवणूक पहाटेपर्यंत सुरू होती. महोत्सवाचे आयोजन श्री उद्धव महाराज समाधी संस्थान, ग्रामपंचायत मुल्हेर, नाम सप्ताह आणि कुस्ती कमिटी यांच्या वतीने करण्यात आले. मठाधिपती भक्तराज महाराज, संस्थानप्रमुख किशोर महाराज, श्रीकांत महाराज, सरपंच निंबाजी भानसे, उपसरपंच बंसीलाल बत्तीसे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामस्थांनी उत्सव यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.
खंडित रथोत्सवाला १९९७ मध्ये पुनर्जीवन शेकडो वर्षांची ऐतिहासिक परंपरा लाभलेल्या उद्धव महाराजांच्या रथोत्सवाला इंग्रज राजवटीच्या काळात खंड पडला होता. संस्थानचे ११ वे मठाधिपती वै. डॉ. रघुराज महाराज पंडित यांनी १९९७ मध्ये या रथोत्सवाला पुनर्जीवित केले. त्यानंतर दरवर्षी परंपरेनुसार हा सोहळा उत्साहात साजरा केला जात आहे. संस्थानच्या धार्मिक व सांस्कृतिक परंपरा जपण्याबरोबरच ग्रामस्थांमध्ये एकात्मतेची भावना वृद्धिंगत करणारा हा उत्सव मुल्हेरच्या सांस्कृतिक वैभवाचा महत्त्वपूर्ण भाग बनला आहे.