![]()
रोजगारासाठी गावोगावी स्थलांतर करणाऱ्या ऊसतोड कामगारांच्या कुटुंबांतील महिला आणि बालकांना शासकीय योजनांपासून वंचित राहावे लागू नये, यासाठी अंगणवाडी विभागाने शिवारातच पोषण आहाराचे किट पोहोचविले. जवळे येथील गव्हाळी शिवारात वास्तव्यास असलेल्या ऊसतोड कामग
.
महिला व बालकल्याण विभागाच्या माध्यमातून गरोदर माता, स्तनदा माता आणि शून्य ते सहा वर्षे वयोगटातील पात्र बालकांना टेक होम रेशन व एचसीएम पोषण आहार उपलब्ध करून दिला जातो. मात्र, रोजगारासाठी स्थलांतर करणाऱ्या ऊसतोड कामगार आणि बांधकाम मजुरांच्या कुटुंबांतील पात्र लाभार्थ्यांची स्थानिक यंत्रणेकडे नोंद नसल्याने योजनांचा लाभ मिळण्यात अडचणी येतात. ही बाब लक्षात घेऊन पर्यवेक्षिका आढाव यांनी गव्हाळी शिवारात वास्तव्यास असलेल्या कामगार कुटुंबांची माहिती संकलित करून त्यांना पोषण आहार उपलब्ध करून दिला. यावेळी पारनेर बाजार समितीचे माजी सभापती किसनराव रासकर उपस्थित होते.
आढाव म्हणाल्या, पोषण आहार योजना केवळ स्थानिक लाभार्थ्यांपुरती मर्यादित नाही. अंगणवाडी कार्यक्षेत्रात वास्तव्यास असलेल्या प्रत्येक पात्र लाभार्थ्यापर्यंत योजनांचा लाभ पोहोचविणे हे विभागाचे उद्दिष्ट आहे. ऊसतोड कामगारांच्या ठेकेदारांनी आपल्या टोळीतील गरोदर माता, स्तनदा माता आणि सहा वर्षांखालील बालकांची आवश्यक माहिती अंगणवाडी विभाग व ग्रामपंचायतीला द्यावी. त्यामुळे लाभार्थ्यांची नोंद घेऊन त्यांच्यापर्यंत पोषण आहार वेळेत पोहोचविता येईल. स्थलांतरामुळे एकाही महिला किंवा बालकाला पोषण आहारापासून वंचित राहावे लागू नये, यासाठी ठेकेदार, ग्रामपंचायत आणि अंगणवाडी यंत्रणेने समन्वयाने काम करावे, असे आवाहन त्यांनी केले.
बालविवाहमुक्त भारताची महिलांना शपथ पोषण आहार वितरणासोबतच सामाजिक जनजागृतीचा उपक्रमही राबविण्यात आला. पर्यवेक्षिका प्रियंका आढाव यांच्या मार्गदर्शनाखाली कामगार महिलांना बालविवाहमुक्त भारताची शपथ देण्यात आली. बालविवाहामुळे मुलींच्या आरोग्यावर, शिक्षणावर आणि भवितव्यावर होणाऱ्या गंभीर परिणामांची माहिती देण्यात आली. मुलींचे भविष्य जपण्यासाठी बालविवाह रोखणे ही प्रत्येकाची सामाजिक जबाबदारी असल्याचे सांगत महिलांमध्ये जनजागृती करण्यात आली.