![]()
विधानसभा २०२४ मध्ये आपल्या नावावर डॉ. श्रीकांत शिंदेंनी ५०० कोटी रुपये भाजपकडून आणले, असा आरोप करत मनोज जरांगेंनी गुरुवारी एक ऑडिओ क्लिप जारी करून संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली. हीच मागणी शिवसेना (शिंदे गट) आणि भाजपकडूनही झाली. ती मान्य करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी क्लिपच्या फॉरेन्सिक तपासणीसह चौकशी करण्याचे आश्वासन दिले. मात्र, अडीच वर्षांनंतर ही क्लिप का बाहेर आली, असा खोचक सवालही केली. दरम्यान, ५०० कोटींच्या मुद्द्यावर शिवसेना नेते रामदास कदम यांनी थेट भाजपवर निशाणा साधत “शिंदेंचा केसाने गळा कापण्याचा कट रचला जात आहे,” असा घणाघाती आरोप केला. यावर भाजपचे विधान परिषद गटनेते प्रवीण दरेकर आणि आमदार प्रसाद लाड यांनी “भाजपला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करणे खपवून घेणार नाही. कदमांनी संजय राऊत बनू नये,” असा पलटवार केला. जरांगेंनीही ‘कदमांची बुद्धी ढळली का?’ असा सवाल केला. दुसरीकडे ओबीसी नेते प्रा. लक्ष्मण हाके यांनी ‘जरांगेंचे सहकारी येरवड्यात गेल्याने क्लिप बाहेर काढली’ असा आरोप करून वादात भर टाकली आहे. तर डॉ. श्रीकांत शिंदेंच्या निकटवर्तीयांनी दिलेल्या माहितीनुसार केवळ प्रतिमा मलिन करण्यासाठी हे षड्यंत्र रचले गेले असून, या बिनबुडाच्या आरोपांविरोधात अब्रूनुकसानीची कायदेशीर नोटीस पाठवण्याबाबत कायदेतज्ज्ञांशी सल्लामसलत सुरू आहे. एकूणात हा वाद आणखी काही दिवस भडकण्याची शक्यता आहे. विरोधकांना नवे हत्यार मिळेल. मात्र, भाजप व एकनाथ शिंदेंचे राजकीय समीकरण आणि राज्यातील सत्तेचा सारीपाट पाहता सरकारवर कोणताही परिणाम होण्याची शक्यता दिसत नाही. मनोज जरांगेंचीच नार्को टेस्ट करा : लक्ष्मण हाके २०२४ मधील क्लिप आताच का बाहेर आली, यावर ओबीसी नेते लक्ष्मण हाके म्हणाले, जरांगेंचे सहकारी तुरुंगात गेल्यानंतरच ही क्लिप कशी बाहेर येते? जरांगेंचीच नार्को टेस्ट करा. सत्तेत नांदून भाजपला शिव्या देणे चालणार नाही : दरेकर प्रवीण दरेकर, प्रसाद लाड म्हणाले, सत्तेत एकत्र नांदून भाजपला शिव्या देणे चालणार नाही. राऊतांच्या भूमिकेत शिरून युतीत मिठाचा खडा टाकू नका. भाजपकडून शिंदेंचा केसाने गळा कापण्याचा प्रयत्न: कदम रामदास कदम म्हणाले, भाजपकडून शिंदेंचा केसाने गळा कापण्याचा प्रयत्न सुरू आहे का हे शोधावे, अशा मागणीचे पत्र मी मोदी, शाह, फडणवीसांना पाठवले आहे. फॉरेन्सिक तपासातून सत्य शोधून काढू : फडणवीस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, पूर्ण फॉरेन्सिक तपासणी करू. अडीच वर्षांनंतर क्लिप बाहेर येण्यामागे नेमका हेतू काय आहे? कोणाला टार्गेट केले जात आहे? यातील सत्य शोधून काढू. मग शिंदेंचे सगळे उद्योग मी बाहेर काढेन : जरांगे जालना – वडीगोद्री | मनोज जरांगे म्हणाले, रामदास कदम शिंदेंचे विचार संपवायला निघालेत. क्लिपची तारीख आणि वेळ कदमांना आधी कशी समजली? माझ्या नादाला लागू नका, नाहीतर मी शिंदेंचे सगळे उद्योग बाहेर काढेन. मग त्यांना तोंड दाखवायला जागा उरणार नाही. या प्रकरणाकडे केवळ मराठा आणि ओबीसी समाजातील वाद म्हणून पाहू नये. या वादात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंबद्दल गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे, असा दावाही त्यांनी केला. क्लिपमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) वापर झाला आहे का, याचीही तपासणी व्हावी, अशी मागणी त्यांनी केली. वादाचे कारण आणि पुढे काय? कारण : क्लिपवरून परस्पर संशय आणि संघटनात्मक वर्चस्वाची चढाओढ हेच वाद वाढीचे कारण. पुढे काय? : ७ ते १० दिवसांत पोलिसात लेखी तक्रारी, महायुती समन्वय समितीची बैठक होईल. दिव्य मराठी नॉलेज: ऑडिओ क्लिप ठोस पुरावा नाही राज्य सायबर सेल आणि फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीकडे ऑडिओ स्पेक्ट्रोग्राफिक विश्लेषण आणि आवाज नमुने चाचणीसाठी सोपवले जाण्याची शक्यता आहे. फौजदारी कायदेतज्ज्ञांनुसार, केवळ कथित ऑडिओ संभाषणाच्या आधारे ठोस पुराव्यांशिवाय लाचलुचपत प्रतिबंधक कायदा लागू होत नाही, मात्र कटकारस्थान आणि फसवणूक (भारतीय न्याय संहिता) अंतर्गत प्राथमिक चौकशी होऊ शकते.
Source link
500 कोटींच्या ऑडिओवरून भाजप-शिवसेना युतीत भडका:मनोज जरांगेंनी जारी केलेल्या क्लिपचे तीव्र राजकीय पडसाद, युतीतील वार-पलटवार