![]()
ज्ञानराधा मल्टिस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीतील गैरव्यवहारामुळे ग्रामीण भागातील खातेदारांचे कोट्यवधी रुपये अडकले आहेत. या पार्श्वभूमीवर शुक्रवारी बीड येथील जिल्हा उपनिबंधक कार्यालयाच्या पथकाने वैजापूर शाखेची झडती घेतली. या कारवाईत महत्त्वाची कागदपत्रे ताब्यात घेण्यासह सोने गहाण ठेवलेल्या ४९ खातेदारांचे सोनेही पथकाने ताब्यात घेतले. जिल्हा उपनिबंधक सतीश तोटावार यांनी या कारवाईला दुजोरा दिला. सोन्याची किंमत व किती वजनाचा मुद्देमाल ताब्यात घेतला याची माहिती पथकाने गुप्त ठेवली. अधिकारी व कर्मचाऱ्यांचे पथक शुक्रवारी दुपारी बाराच्या सुमारास ज्ञानराधा मल्टीस्टेटच्या वैजापूर शाखेत दाखल झाले. पथकाने शाखेतील कागदपत्रांची तपासणी करून पंचनामा केला. त्यानंतर महत्त्वाचे दस्तावेज व गहाण ठेवलेले सोने ताब्यात घेतले. संबंधित खातेदारांनी बीड येथे जाऊन आवश्यक प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर आपले सोने सोडवून न्यावे, असे जिल्हा उपनिबंधक सतीश तोटावार यांनी सांगितले. ठेवींच्या परताव्याबाबत विचारणा : अनेकांनी आपल्या ठेवींच्या परताव्याबाबत अधिकाऱ्यांकडे विचारणा केली. मात्र, ठेवीदारांना पैसे नेमके कधी मिळणार, याबाबत अद्याप स्पष्टता नाही. त्यामुळे ४९ खातेदारांच्या सोन्याबाबत कारवाई झाल्यानंतर आता कोट्यवधी रुपयांच्या ठेवी परत मिळवून देण्यासाठी प्रशासन कोणती पावले उचलणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे. सोने सोडवण्यासाठी कर्जाची पावती, ओळखपत्र लागेल पथकाकडील सोने सोडवण्यासाठी खातेदाराला बीडच्या जिल्हा उपनिबंधक कार्यालयात जावे लागेल. सोन्यावरील कर्जाची पावती व ओळखीचा पुरावा सादर करावा लागेल. कर्जाची पूर्ण
परतफेड झाल्यानंतरच सोने सोडवता येईल.
Source link
वैजापुरात ज्ञानराधा मल्टिस्टेट शाखेवर छापा:49 खातेदारांचे तारण ठेवलेले सोने ताब्यात; बीडच्या जिल्हा उपनिबंधक पथकाकडून कागदपत्रे जप्त