Headlines

'ऑपरेशन टायगरचाच भाग म्हणजे ऑपरेशन वरळी':उदय सामंतांचा मोठा दावा; म्हणाले- केंद्रीय मंत्रिमंडळात शिवसेनेला अधिक प्रतिनिधित्व मिळाल्यास आनंदच होईल




शिवसेनेचे नेते आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर जोरदार टीका करत, सचिन अहिर यांच्या प्रवेशानंतर आता “ऑपरेशन वरळी” सुरू झाल्याचा दावा केला. शिवसेना (शिंदे गट) अधिक मजबूत होत असून, मुंबईसह राज्यभरातून नेत्यांचा पक्षप्रवेश सुरूच राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ‘ऑपरेशन टायगरचाच भाग म्हणजे ऑपरेशन वरळी’ सचिन अहिर यांच्या शिंदे गटातील प्रवेशानंतर पुढे आणखी नेते पक्षात येणार का, असा प्रश्न विचारला असता उदय सामंत म्हणाले की, पक्षप्रवेशाची प्रक्रिया रोज सुरू आहे. कालही अनेकांनी पक्षात प्रवेश केला असून सचिन अहिर यांचा प्रवेश काही लोकांना मोठा धक्का देणारा ठरला आहे. “सचिन अहिर यांच्यासारखा मोठा नेता जर आमच्यासोबत येत असेल, तर महाराष्ट्रातील जनतेलाही काहीतरी घडत असल्याची जाणीव झाली आहे. हे वेगळं ऑपरेशन नाही. ‘ऑपरेशन टायगर’चाच एक भाग म्हणजे ‘ऑपरेशन वरळी’ आहे,” असा दावा त्यांनी केला. सुनील शिंदे आले तर स्वागतच करू! वरळीचे आमदार सुनील शिंदे यांच्याबाबत सुरू असलेल्या चर्चांवर बोलताना सामंत म्हणाले की, सुनील शिंदे यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे. मात्र, त्यांनी भविष्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याची इच्छा व्यक्त केली, तर त्यांचे स्वागत करण्यात येईल. ते म्हणाले, “सुनील शिंदे हे सक्षम नेतृत्व आहे. ते धनुष्यबाण या चिन्हावर निवडून आले आहेत. त्यांना त्यांच्या मतदारसंघाचा विकास करण्यासाठी आमच्यासोबत यायचं असेल, तर आम्ही त्यांना का नाकारू?” ‘सचिन अहिरांचा प्रवेश धक्का देणारा’ सामंत म्हणाले की, काही जण चेहऱ्यावर दाखवत नसले तरी सचिन अहिर यांचा प्रवेश त्यांच्यासाठी मोठा धक्का आहे. “सचिन अहिर यांच्यासारखा नेता जर बाजूला जाऊ शकतो, तर त्यामागे काहीतरी गंभीर कारण असणार, हे महाराष्ट्रातील जनतेलाही समजलं आहे,” असे ते म्हणाले. अधिवेशनात फक्त राजकारणच नाही, विकासाच्या मुद्द्यांवरही चर्चा विधानसभेच्या आगामी पावसाळी अधिवेशनात केवळ पक्षांतरावर चर्चा होत असल्याच्या टीकेला उत्तर देताना सामंत यांनी सरकार विकासाच्या प्रश्नांवरही तितक्याच गांभीर्याने काम करत असल्याचे सांगितले. “मुंबईतील नालेसफाई, शेतकऱ्यांचे प्रश्न, कामगारांचे प्रश्न, मराठी भाषा, उद्योग विभाग अशा अनेक विषयांवर सभागृहात दररोज चर्चा होत आहे. प्रश्नोत्तर, लक्षवेधी, अर्धा तास चर्चा अशा सर्व संसदीय साधनांचा वापर करून आम्ही महाराष्ट्राला न्याय देण्याचा प्रयत्न करत आहोत,” असे त्यांनी स्पष्ट केले. श्रीकांत शिंदेंच्या पदवीबाबतच्या आरोपांवर प्रत्युत्तर खासदार श्रीकांत शिंदे यांच्या वैद्यकीय पदवीबाबत करण्यात आलेल्या आरोपांवरही उदय सामंत यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, “हा विषय तीन वर्षांपूर्वीही उपस्थित करण्यात आला होता. त्यावेळीही काही निष्पन्न झाले नव्हते. श्रीकांत शिंदे हे स्वतः ऑर्थोपेडिक सर्जन आहेत. त्यांच्या पदवीवर आक्षेप घेण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही.” सामंत यांनी पुढे सांगितले की, पहिली निवडणूक त्यांनी एकनाथ शिंदे यांचे पुत्र म्हणून लढवली असेल, पण त्यानंतर त्यांनी स्वतःचे स्वतंत्र नेतृत्व निर्माण केले आहे. “आज त्यांच्या कामाची दखल इतर लोकही घेत आहेत. हे त्यांच्या स्वतःच्या कर्तृत्वाचं यश आहे,” असे ते म्हणाले. केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारावरही भाष्य शिवसेनेला केंद्रात आणखी मंत्रिपदे मिळणार का, या प्रश्नावर उदय सामंत यांनी सांगितले की, याबाबत अंतिम निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या चर्चेनंतर होईल. “केंद्रात शिवसेनेच्या दोन खासदारांना मंत्रिपद मिळणार असल्याची चर्चा आहे. मंत्रिपदांची संख्या किती असेल याची आम्हाला माहिती नाही. मात्र, शिवसेनेला अधिक प्रतिनिधित्व मिळाले तर आम्हाला निश्चितच आनंद होईल,” असे त्यांनी सांगितले. ‘हे ऑपरेशनमुळे नाही, तर एकनाथ शिंदेंवरील विश्वास’ पत्रकार परिषदेच्या शेवटी सामंत यांनी सचिन अहिर यांच्या प्रवेशाचे श्रेय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाला दिले. “हे कोणते ऑपरेशन नाही. हा एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर लोकांचा असलेला विश्वास आहे. महाराष्ट्राचे माजी मंत्री आणि तीन वेळा आमदार राहिलेले सचिन अहिर आज आमच्यासोबत आले. त्यांना उपसभापतीपदाची संधी देण्यात आली. असे सक्षम नेतृत्व आमच्यासोबत येत आहे, हीच आमच्यासाठी मोठी गोष्ट आहे,” असे उदय सामंत यांनी म्हटले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *