Headlines

आंतरराज्य गुन्हेगारीला बसणार चाप; यंत्रणेत प्रभावी समन्वय:महाराष्ट्र-मध्यप्रदेश राज्यातील पोलिस अधिकाऱ्यांची परतवाड्यात बैठक‎




महाराष्ट्र आणि मध्यप्रदेश या दोन्ही राज्यांच्या सीमावर्ती भागातील गुन्हेगारीला चाप लावण्यासाठी आणि कायदा व सुव्यवस्था अधिक मजबूत करण्यासाठी शनिवारी (दि. ४) महत्त्वाची घडामोड घडली. अमरावती ग्रामीण पोलिस दलाच्या पुढाकाराने परतवाडा येथे महराष्ट्र व एमपी राज्यांतील वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांची ‘आंतरराज्य समन्वय बैठक’ पार पडली. या बैठकीमुळे दोन्ही राज्यांतील पोलीस यंत्रणेत आता अधिक प्रभावी समन्वय निर्माण होणार असून, सीमावर्ती भागातील गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहेत. या महत्त्वपूर्ण बैठकीला महाराष्ट्राच्या वतीने अमरावती परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. महेश पाटील, अमरावतीचे एसपी निकेतन कदम आणि अपर पोलिस अधीक्षक दत्ता तोटेवाड उपस्थित होते. तसेच धारणीचे उप-विभागीय पोलीस अधिकारी माधव गरुड, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अशोक लांडे यांच्यासह मध्यप्रदेशच्या सीमेला लागून असलेल्या सर्व पोलिस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी हजर होते. दुसरीकडे, मध्यप्रदेश राज्याचे प्रतिनिधित्व करत नर्मदापुरम परिक्षेत्राचे पोलिस उपमहानिरीक्षक मिथिलेश कुमार शुक्ला, बैतुलचे एसपी विरेंद्रकुमार जैन, पांढुर्णाचे एसपी प्रकाशसिंह परिहार आणि बऱ्हाणपूरचे अपर पोलिस अधीक्षक प्रदीप शेंडे हे प्रामुख्याने उपस्थित होते. त्यांच्यासोबत बैतुल, बऱ्हाणपूर, खंडवा व पांढुर्णा या सीमावर्ती जिल्ह्यांमधील पोलिस ठाण्यांचे प्रभारी अधिकारीही या बैठकीला होते. या सकारात्मक आणि प्रभावी उपाययोजनांमुळे दोन्ही राज्यांमधील पोलिस यंत्रणेतील परस्पर सहकार्य अधिक दृढ होईल आणि सीमावर्ती भागातील सर्वसामान्य नागरिकांची सुरक्षा बळकट होईल, असा विश्वास या बैठकीच्या शेवटी पोलिस प्रशासनातर्फे व्यक्त करण्यात आला. या हाय-प्रोफाइल बैठकीमध्ये दोन्ही राज्यांच्या सीमावर्ती भागातील कायदा व सुव्यवस्थेचा सविस्तर आढावा घेण्यात आला. विशेषतः अमली पदार्थांची तस्करी, गोवंश तस्करी, दारूबंदी, वाहन चोरी, सायबर गुन्हे यांसारख्या गंभीर गुन्ह्यांवर संयुक्तपणे कशी कारवाई करता येईल, यावर दोन्ही बाजूंच्या अधिकाऱ्यांनी सखोल चर्चा केली. सराईत व फरार गुन्हेगारांची माहिती एकमेकांशी शेअर करणे, विविध गंभीर गुन्ह्यांच्या तपासासाठी आणि प्रलंबित वॉरंट बजावण्यासाठी परस्परांना तातडीने मदत करणे यावरही यात एकमत झाले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *