Headlines

भातकुली पंचायत समितीत पीओपी जमीनदोस्त:कामकाजही प्रभावित, कर्मचाऱ्यांच्या जीवावर बेतण्यापूर्वी दुरुस्तीची मागणी‎




भातकुली पंचायत समितीच्या शिक्षण विभागातील पीओपी अचानक जमीनदोस्त झाल्याने तेथील कामकाज प्रभावित झाले आहे. पीओपी ज्यावेळी पडले, त्यावेळी सुदैवाने कुणी कर्मचारी तेथे नव्हते, त्यामुळे मोठा अनर्थ टळला. परंतु एकूणच इमारत नादुरुस्त झाल्याने त्वरेने दुरुस्तीकार्य हाती घ्यावे, अशी मागणी कर्मचारी संघटनेने केली आहे. जिल्हा परिषदेचे सीईओ सत्यम गांधी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्रीराम कुळकर्णी, बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता लीना वंजारी यांच्यासह इतर संबंधित अधिकाऱ्यांना पाठविलेल्या निवेदनातून ही मागणी पुढे आली आहे. संघटनेचे अध्यक्ष पंकज गुल्हाने व त्यांच्या सहकाऱ्यांनी व्यक्तिश: व इ-मेलद्वारे ही निवेदने पाठविली. भातकुली पंचायत समितीची इमारत आधीच धोकादायक स्थितीत पोहोचली आहे. शिक्षण विभागातील पीओपी पडण्यापूर्वी इतर विभागातही पडझड झाली आहे. त्यामुळे इमारतीच्या दुरुस्तीकडे तातडीने लक्ष देणे, गरजेचे झाले आहे. या कार्यालयामधील अधिकारी, कर्मचारी यांना जीव मुठीत घेऊन काम करावे लागत आहे. हे कार्यालय लोकाभिमुख असल्यामुळे येथे नागरिकांची नियमीत वर्दळ असते. अशा परिस्थितीत उर्वरित पी.ओ.पी.चा भाग कोणत्याही वेळी खाली पडून दुखापत होऊ शकते. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाने तत्काळ स्थळ पाहणी करुन या इमारतीची योग्य ती दुरुस्ती करावी, अशी मागणी कर्मचारी संघटनेने केली आहे. जि. प. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना अनुभव इमारत धोकादायक स्थितीत पोहोचल्याची अनुभव सीईओ सत्यम गांधी यांनाही आला आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी त्यांनी या कार्यालयाला भेट दिली होती. त्यावेळी चक्क गळणारे पाणी त्यांनी पाहिले. गळती होते म्हणून संगणक व इतर साहित्य अक्षरश: झाकून ठेवावे लागते, हेही त्यांच्या नजरेतून सुटले नाही. त्यांनी त्याचवेळी नव्या इमारतीचा विचार पुढे केला होता. परंतु अद्यापही त्या विचारावर अंमल होताना दिसत नाही



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *