![]()
केंद्र शासनाच्या नशामुक्त भारत अभियानांतर्गत सटाणा नगरपरिषदेच्या वतीने गुरुवारी शहरात जनजागृती रॅली, पथनाट्य आणि सामूहिक शपथविधीचे आयोजन करण्यात आले. व्यसनमुक्त समाजाची निर्मिती आणि युवकांना व्यसनांपासून दूर ठेवण्याच्या उद्देशाने आयोजित या उपक्रमाला
.
शहरातून काढण्यात आलेल्या जनजागृती रॅलीत शालेय विद्यार्थी, विविध सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी, नगर परिषदेचे पदाधिकारी नगरसेवक, अधिकारी, कर्मचारी, स्वयंसेवक तसेच नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. “नशामुक्त युवा- विकसित भारत, व्यसनाला नाही, आरोग्याला होकार, व्यसनमुक्त समाज हीच खरी प्रगती’ अशा घोषणांनी शहर परिसर दुमदुमून गेले होते. विद्यार्थ्यांनी हातात जनजागृतीपर फलक घेऊन नागरिकांना व्यसनमुक्तीचा संदेश दिला. रॅलीची सांगता महात्मा गांधी चौकात झाली. यावेळी उपस्थित सर्वांनी व्यसनमुक्त भारत घडविण्याची सामूहिक शपथ घेतली. व्यसनामुळे व्यक्ती, कुटुंब आणि समाजाचे मोठे नुकसान होत असल्याने व्यसनमुक्ती ही केवळ शासनाची नव्हे, तर प्रत्येक नागरिकाची सामूहिक जबाबदारी असल्याचा संदेश यावेळी देण्यात आला.
अभियानादरम्यान शहरातील विविध भागांत सादर करण्यात आलेल्या पथनाट्यांमधून तंबाखू, गुटखा, मद्य, अमली पदार्थ आणि इतर व्यसनांमुळे होणारे शारीरिक, मानसिक, आर्थिक व सामाजिक दुष्परिणाम प्रभावीपणे मांडण्यात आले. या जनजागृती रॅलीचा शुभारंभ नगराध्यक्षा हर्षदा पाटील यांच्या हस्ते झाला. यावेळी उपनगराध्यक्षा सोनाली बैताडे, शिवसेना गटनेते राहुल पाटील, भाजप गटनेते चेतन रौंदळ, श्री देवमामलेदार गटनेत्या मनीषा पवार, पाणीपुरवठा सभापती भूषण सोनवणे आदींसह सर्व समिती सभापती, नगरसेवक मुख्याधिकारी ज्योती भगत, पोलिस निरीक्षक योगेश पाटील आदी उपस्थित होते. या अभियानात मराठा इंग्लिश स्कूल, ज्ञानगंगा अकॅडमीसह विविध शाळांतील विद्यार्थी-शिक्षक, सामाजिक संस्था, महिला बचत गट आणि स्वयंसेवक सहभागी झाले. विद्यार्थ्यांनी जनजागृती फलकांच्या माध्यमातून व्यसनमुक्तीचा प्रभावी संदेश समाजापर्यंत पोहोचविला.
शहरात पथनाट्य, निबंध-चित्रकला स्पर्धांसह विविध उपक्रम काही दिवसांत शहरातील विविध भागांत जनजागृतीपर रॅली, पथनाट्य, निबंध व चित्रकला स्पर्धा, शपथविधी आणि व्यसनमुक्तीविषयक विविध उपक्रम राबविण्यात येणार असून, ‘नशामुक्त भारत-विकसित भारत’ ही संकल्पना अधिक प्रभावीपणे जनतेपर्यंत पोहोचविण्यावर भर दिला जाणार आहे. – ज्योती भगत, मुख्याधिकारी