![]()
छत्रपती शिवाजी महाराज शासकीय रुग्णालयातील बी-ब्लॉकच्या तिसऱ्या मजल्यावरील सर्जरी वॉर्डमध्ये डागडुजी सुरू असल्याने रुग्णांना वॉर्डाबाहेरील जागेत ठेवण्यात आले आहे. तेथेच उपचार सुरू असल्याने रात्री डासांचा वाढता प्रादुर्भाव आणि दिवसा-रात्री उकाड्याचा त्
.
गेल्या काही दिवसांपासून वॉर्डमध्ये नवीन फरशीकरणासह अन्य डागडुजीचे काम सुरू आहे. काम सुरू झाल्यानंतर आतील रुग्णांना बाहेरील जागेत हलवण्यात आले. त्यामुळे उपचारासाठी दाखल असलेल्या रुग्णांसाठी ही जागाच तात्पुरता वॉर्ड बनली आहे. खाट उपलब्ध नसलेल्या रुग्णांसाठी तर जमिनीवर गादी टाकून उपचार करण्याची वेळ आली आहे. तिसऱ्या मजल्यावर सर्जरी वॉर्डातील ३० ते ३५ रुग्ण ॲडमिट आहेत. अगदी जवळ चिटकून त्यांचे बेड लावण्यात आले आहेत. रुग्णांसोबत नातेवाईक असून त्यांनाही गैरसोयीचा त्रास होत आहे.
गंभीर प्रकृतीच्या रुग्णांना ऑक्सिजनची सुविधा असलेल्या अन्य वॉर्डमध्ये हलवण्यात आले आहे. मात्र, इतर रुग्णांवर उपलब्ध जागेतच उपचार सुरू आहेत. डागडुजीचे काम नेमके आणखी किती दिवस चालणार ? याबाबत रुग्ण आणि नातेवाइकांना स्पष्ट माहिती नाही. त्यामुळे काम पूर्ण होईपर्यंत हीच परिस्थिती कायम राहण्याची शक्यता आहे.
बांधकामानंतर वॉर्ड पूर्वीपेक्षा होईल सुसज्ज
सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत हे काम सुरू आहे. वॉर्डात फरशीकरण व अन्य कामे होणार असून आतील भाग पूर्वीपेक्षा सुसज्ज होणार आहे. लवकरच ते पूर्ण होईल त्यानंतर पुन्हा रुग्ण आत जातील. डॉ. कमलाकर माने, वैद्यकीय अधीक्षक
काळजी घेण्यासोबत हाताने वारा घालण्याची नातेवाइकांना ‘ड्युटी’!
रुग्णालयात दाखल झालेल्या व्यक्तीची सेवा करण्यासाठी आलेल्या नातेवाइकांवर उपचारांबरोबरच हाताने वारा घालण्याची जबाबदारी आली आहे. रात्री उकाडा वाढल्यानंतर रुग्णाला आराम मिळावा म्हणून नातेवाईकांना हाताने वारा घालत आहेत. रुग्णाच्या शेजारी बसणे, डास हाकलणे आणि वारा घालणे, अशी ‘ड्युटी’ नातेवाइकांना करावी लागत असल्याचे चित्र आहे.