Headlines

उसाच्या फडात शेतकऱ्याच्या वेशात जाऊन ‘समृद्धी’वर लुटणारे आणखी दोघे पकडले:उजनी धरणाच्या परिसरात 8 एकरांवरील उसात पोलिसांचे कोम्बिंग ऑपरेशन



समृद्धी महामार्गावर हडसपिंपळगाव टोलनाक्याजवळ उद्योजकाची फॉर्च्युनर अडवून सिनेस्टाइल लूटमार करणाऱ्या कुख्यात आंतरराज्य टोळीच्या मुसक्या आवळण्यात ग्रामीण पोलिसांना यश आले.

.

मोहीम छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलिसांनी अधिक तीव्र केली आहे. मुख्य सूत्रधार परशुराम गायकवाड याला दिल्लीतून जेरबंद केल्यानंतर, आता याच टोळीतील आणखी दोन सराईत आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. उजनी धरणाच्या (जि. पुणे) जलाशयालगतच्या तब्बल ८ एकर परिसरातील दाट उसाच्या फडात लपलेल्या या आरोपींना पकडण्यासाठी ग्रामीण पोलिसांना शेतकऱ्यांचा वेश धारण करावा लागला. खांद्यावर शेतीची अवजारे आणि पाठीवर औषध फवारणीचा पंप घेऊन राबवलेल्या या थरारक ‘कोम्बिंग ऑपरेशन’नंतर मुख्य सूत्रधाराचा मेहुणा आणि त्याच्या साथीदाराला अटक करण्यात आली आहे.

ज्ञानेश्वर शहादेव जाधव (३४, रा. मालेवाडी, ता. पाथर्डी ) आणि उमेश लक्ष्मण गायकवाड (२७, रा. पिठी नायगाव, ता. पाटोदा) अशी या अटक केलेल्या सराईत गुन्हेगारांची नावे आहेत. स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक विजयसिंग राजपूत, भारत निकाळजे, सुनील गोरे यांच्या पथकाने केलेल्या या कारवाईमुळे गुन्ह्यात आतापर्यंत ७ जणांना अटक करण्यात आली आहे.

‘एमएच २०’ दिसताच अन् ‘राँग साइड’ने धूम

मुख्य आरोपी पकडले गेल्यानंतर ज्ञानेश्वर आणि उमेश हे दोघे इंदापूर (जि. पुणे) परिसरातील टोलनाक्यावर युनिकॉर्न दुचाकीवरून जाताना साध्या वेशातील पोलिसांच्या निदर्शनास आले. मात्र, अत्यंत सराईत असलेल्या ज्ञानेश्वरची नजर पोलिसांच्या ‘एमएच २०’ क्रमांक असलेल्या गाडीवर पडली आणि त्याला संशय आला. क्षणाचाही विलंब न लावता त्याने भरधाव वेगात दुचाकी वळवली आणि महामार्गावर थेट राँग साइडने पळ काढला. गाडीचा वेग इतका भयंकर होता की, समोरून येणाऱ्या वाहनाला धडक लागून मोठा अनर्थ ओढवण्याची शक्यता होती.

घराच्या परिसरात सीसीटीव्ही अन् सुरक्षेची व्यवस्था

परशुराम गायकवाडने गावाकडील घराच्या आजूबाजूला सीसीटीव्ही कॅमेरे लावले आहेत. त्याचे ॲक्सेस त्याच्याकडे असायचे, जेणेकरून गावात अनोळखी व्यक्ती किंवा पोलिस आले तर त्याला लगेच माहिती मिळायची. शिवाय, बीडमधील एका कॉलनीमध्ये या टोळीचा वावर असायचा. या कॉलनीत रात्रीच्या वेळी पोलिस महिला आणि स्थानिक रहिवासी दगडफेक किंवा हल्ला करत होते.

‘पोलिस माघारी’चा बनाव अन् शेतकऱ्यांचा वेश

परिसरात संशय येऊ नये म्हणून पोलिसांच्या पथकाने वेशांतर केले. पोलिसांनी शेतकऱ्यांचे मळके कपडे घातले, पाठीवर फवारणीचा रिकामा पंप अडकवला आणि खांद्यावर फावडे घेऊन ते थेट उसाच्या फडात घुसले. आतमध्ये आरोपींची दुचाकी सापडल्याने ते उसातच असल्याची खात्री पटली. मात्र, दाट उसामुळे ते सापडत नसल्याने पोलिसांनी शोधमोहीम थांबवून माघारी परतले आहेत, असा बनाव रचला. पोलिस गेल्याच्या गैरसमजात परशुरामचा मेहुणा ज्ञानेश्वर आणि उमेश बाहेर आले. त्या वेळी पोलिसांनी त्यांना झडप घालून पकडले.

पाऊस, बिबट्याची भीती अन् उजनीचे बॅकवॉटर

पोलिसांनीही त्यांच्या मागे चारचाकी नेली. आरोपींनी शहागाव शिवारात दुचाकी टाकून उजनी धरणालगत असलेल्या ८ एकरांच्या उसाच्या फडात धूम ठोकली. उजनी जलाशयाचा तो भाग असल्याने सर्वत्र पाणी होते. त्यातच जोरदार पाऊस सुरू झाला. उसात बिबट्या आणि वन्यप्राण्यांचा मोठा धोका होता. अशा परिस्थितीत घाई न करता पोलिसांनी गावकऱ्यांना विश्वासात घेतले. गावकऱ्यांच्या सुरक्षेची काळजी घेत शोधमोहीम आखली.

मास्टरमाइंड परशुराम गायकवाडचा मेहुणा ज्ञानेश्वर जेरबंद

1 समृद्धी महामार्गावर राहुरीच्या उद्योजकाला फॉर्च्युनरमध्ये अडवून लुटणाऱ्या आंतरराज्य टोळीचा मुख्य सूत्रधार परशुराम गायकवाडला बुधवारी पकडले आहे. परशुराम व त्याच्या साथीदाराने दिल्लीतील एका उच्चभ्रू पबमध्ये पार्टी केली आणि एकाच रात्रीत दीड लाख रुपये उडवले.

2 दिल्लीत परशुरामला पकडण्यासाठी गेलेले पोलिस साध्या वेशात होते. मात्र, आरोपींचा पोलिसांच्या कार्यपद्धतीचा आणि मानवी स्वभावाचा अत्यंत बारीक अभ्यास होता. परशुरामने गर्दीत पोलिसांना पाहिले आणि त्यांना ओळखलेही.

3 दिल्लीच्या वातावरणात महाराष्ट्रातील लोकांना येणारा जास्त घाम, या एका बारकाव्यावरून त्याने हे महाराष्ट्राचे पोलिस असल्याचे हेरले. मात्र, तो परशुरामला सावध करण्यापूर्वीच साध्या वेशातील पोलिसांनी झडप घालून त्याला उचलले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *