![]()
द. मा. मिरासदार हे खूप अभ्यासू आणि प्रसन्न व्यक्तिमत्त्व होते. त्यांची प्रसन्नता चेहऱ्यावर आणि बोलण्यात दिसायची. मिरासदार आणि गरवारे महाविद्यालयातील शिक्षकांनीच आम्हाला बहुश्रुतता देत घडवले. महाविद्यालयातूनच वाचन आणि चर्चा करण्याची आवड निर्माण झाली. त्यामुळे द. मा. मिरासदार यांच्या आठवणी फक्त जन्मशताब्दी वर्षातच नाही, तर पुढेही जपल्या जातील, असे गरवारे महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी आणि माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर म्हणाले. सुप्रसिद्ध साहित्यिक आणि मएसो गरवारे वाणिज्य महाविद्यालयाचे माजी प्राध्यापक प्रा. द. मा. मिरासदार यांच्या जन्मशताब्दीनिमित्त आणि गरवारे महाविद्यालयाच्या हीरक महोत्सवानिमित्त महाविद्यालयातील ग्रंथालय वाचन कक्षाला ‘प्रा. द. मा. मिरासदार ग्रंथदालन’ असे नाव देण्यात आले. त्यावेळी प्रकाश जावडेकर बोलत होते. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या मएसो गरवारे कॉलेज ऑफ कॉमर्सतर्फे (स्वायत्त) महाविद्यालयातील स्वा. सावरकर सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त) कार्यक्रमाचे अध्यक्ष होते. भाजपाचे सरचिटणीस आणि राष्ट्रीय पुस्तक न्यासाचे संचालक राजेश पांडे, मएसो नियामक मंडळाचे अध्यक्ष बाबासाहेब शिंदे, कोहिनूर ग्रुपचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल, प्रा. द. मा. मिरासदार जन्मशताब्दी समितीचे निमंत्रक हरीभाऊ मिरासदार आणि प्राचार्य डॉ. किशोर देसर्डा मंचावर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक वामन प्रभाकर भावे, आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके आणि लक्ष्मण नरहर इंदापूरकर यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांनी केले. यावेळी द. मा. मिरासदार प्रतिष्ठानचे अध्यक्ष रवींद्र मंकणी, सुनेत्रा मंकणी, प्रसाद मिरासदार, मकरंद टिल्लू, मूर्तीशास्त्राचे अभ्यासक डॉ. गो. बं. देगलूरकर, मंगला गोडबोले, सुनील महाजन, मेहता पब्लिशिंग हाऊसचे अखिल मेहता आणि ग्रंथपाल अश्विनी ठाकूर यांच्यासह मिरासदार परिवारातील अनेक जण उपस्थित होते. रवींद्र मंकणी यांनी निर्मिती केलेला आणि प्रसाद मिरासदार यांनी दिग्दर्शित केलेला ‘माझी मिरासदारी’ हा द. मा. मिरासदार यांच्या जीवनावरील लघुपटही दाखवण्यात आला. प्रकाश जावडेकर पुढे म्हणाले की, भारतीय ज्ञान परंपरेमध्ये खूप ताकद आहे. देशात अनेक उत्तम ग्रंथालये होती, पण मोगल आक्रमकांनी ती नष्ट केली. भारतीय ज्ञानपरंपरा पुढे जपण्यासाठी नॅशनल डिजिटल लायब्ररीचा उपक्रम सुरू करण्यात आला. पुण्यातील ग्रंथालयांमध्ये आज स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे विद्यार्थी दिसतात, हे सत्य आहे. अशा काळात गरवारे महाविद्यालयातील ग्रंथालयाला दररोज सुमारे २०० विद्यार्थी भेट देतात, हे कौतुकास्पद आहे.
Source link
गरवारे महाविद्यालयातील वाचन कक्षाला प्रा. द. मा. मिरासदार यांचे नाव:माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर म्हणाले, 'मिरासदार यांनीच आम्हाला बहुश्रुतता दिली'