Headlines

थरावर थर… हंडीपर्यंत नजर!‎:शहरात दहीहंडीच्या उत्साहाचे उधाण; ढोल-ताशांच्या तालावर तरुणाई थिरकली‎




दहीहंडीच्या उत्साहाने शनिवारी अहिल्यानगर शहर दुमदुमून गेले. शहरातील विविध भागांत सायंकाळपासूनच गोविंदा पथकांची लगबग सुरू होती. ढोल-ताशांचा गजर, डीजेचा दणदणाट आणि ‘गोविंदा आला रे…’च्या जयघोषात वातावरण जल्लोषमय झाले. थरावर थर रचत हंडीपर्यंत नजर पोहोचवण्याचा गोविंदांचा थरार पाहण्यासाठी चौकाचौकांत नागरिकांची गर्दी झाली. हंडी फोडण्यासाठी गोविंदा पथकांमध्ये चुरस रंगली. एका पथकाने थर रचताच दुसरे पथक त्यापेक्षा उंच मनोरा उभारण्याच्या तयारीत दिसत होते. हंडीपर्यंत पोहोचताना प्रत्येक थरावर गोविंदांच्या चेहऱ्यावर उत्साह, तर खाली उभ्या असलेल्या समर्थकांच्या घोषणांनी वातावरण भारावून गेले. काही ठिकाणी दहीहंडी फोडणाऱ्या पथकांसाठी एक ते दोन लाख रुपयांपर्यंतची बक्षिसे ठेवण्यात आली होती. गोविंदांच्या थरांचा थरार पाहण्यासाठी महिला, लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांनीही मोठी गर्दी केली. सेलिब्रिटींच्या उपस्थितीमुळे काही ठिकाणच्या कार्यक्रमांची रंगत आणखी वाढली. रात्री उशिरापर्यंत ढोल-ताशे आणि डीजेच्या तालावर शहरात दहीहंडीचा जल्लोष सुरू होता. शहरातील पोलिसांची ध्वनिप्रदूषणावर नजर शहरातील कोतवाली आणि तोफखाना पोलिस ठाण्याच्या हद्दीत प्रमुख चौकांसह चार ते पाच ठिकाणी दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. उत्सवादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी कार्यक्रमस्थळी चोख पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. दरम्यान, ध्वनिप्रदूषणाच्या नियमांचे उल्लंघन होऊ नये, यासाठी तोफखाना पोलिसांनी विविध दहीहंडी कार्यक्रमस्थळांना भेटी देत पाहणी केली. ध्वनिक्षेपकांची ध्वनिपातळी निर्धारित मर्यादेपेक्षा अधिक आढळल्यास संबंधित आयोजकांवर कारवाई करण्यात येईल, असा इशारा पोलिसांनी दिला.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *