![]()
महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि कर्नाटक या तीन राज्यांमध्ये वाघांच्या शिकारीचे मोठे जाळे चालवणारा कुख्यात शिकारी शेरू पारधी अखेर मध्य प्रदेश ‘टायगर स्ट्राइक फोर्स’च्या हाती लागला आहे. त्याला मध्य प्रदेश आणि छत्तीसगडच्या सीमेवरून त्याची पत्नी बिनौरी हिच्यासह पकडण्यात आले. शेरू पारधी उर्फ शेरू छेलाल धुर्वे याच्यावर २००२ मध्ये कर्नाटकात वाघाच्या शिकारीचा गुन्हा दाखल आहे. तसेच, २०१३ मध्ये महाराष्ट्रात झालेल्या एका शिकार प्रकरणातही त्याच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला होता. या दोन्ही प्रकरणांमध्ये तो गेल्या १३ वर्षांपासून वनविभाग आणि पोलिसांना गुंगारा देत फरार होता. महाराष्ट्रातील या प्रकरणाचा तपास केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) केला आहे. ही टोळी पुन्हा सक्रिय झाल्याची माहिती ‘वाइल्डलाइफ प्रोटेक्शन सोसायटी ऑफ इंडिया’ला मिळाली होती. त्यांनी ही माहिती मध्य प्रदेशच्या वन विभागाला दिली. त्यानंतर वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी शेरूच्या पत्नीच्या मोबाईल फोनचे लोकेशन शोधून ही कारवाई केली. शेरूचे संपूर्ण कुटुंबच शिकारीच्या या कामात गुंतले आहे. त्यांच्यावर बहेलिया शिकारी म्हणून गुन्हे नोंद आहेत. याआधी २५ जानेवारी २०२५ रोजी त्याच्या टोळीतील अजित, कुट्टू आणि इतर नातेवाईकांना अटक करण्यात आली होती. ते सध्या चंद्रपूर येथील कोठडीत आहेत. ही टोळी भारतातील वेगवेगळ्या राज्यांमध्ये वाघांची शिकार करून त्यांचे अवयव आसाम, मेघालय आणि मिझोराममधील मध्यस्थांना विकायची. तिथून म्यानमारमार्गे हे अवयव परदेशात आंतरराष्ट्रीय बाजारात विकले जात होते. अटक केल्यानंतर शेरू आणि त्याच्या पत्नीला जबलपूर येथील विशेष न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना ५ दिवसांची वनकोठडी सुनावली आहे. मध्य प्रदेशातील कायदेशीर प्रक्रिया आणि चौकशी पूर्ण झाल्यावर त्याला महाराष्ट्र वन विभागाकडे सोपवण्यात येईल.
Source link
13 वर्षांपासून फरार कुख्यात शिकारी शेरू पारधी अटकेत:कर्नाटकातील वाघ शिकार प्रकरणात मध्य प्रदेशातून पत्नीसह पकडला