![]()
शहरात विविध ठिकाणी गुरुवार १० रोजी बैलपोळा उत्साहात तसेच जल्लोषाच्या वातावरणात साजरा झाला. आता बैलपोळ्याच्या दुसऱ्या दिवशी शुक्रवार ११ रोजी शहरातील श्री अंबादेवी, श्री एकवीरा देवी मंदिर परिसर, नेहरू मैदान, राजापेठ, रवीनगर, अंबा गेटच्या आत बुधवारा,भाजीबाजार, इतवारा बाजार, गाडगेनगर, नवसारी, दस्तूरनगर, गोपालनगर, बडनेरा, अत्यंत उत्साहात आणि भक्तिभावाने ”तान्हा पोळा” साजरा केला जाणार आहे. मातीचे व लाकडी बैल सजवण्याचा आनंद हा लहान बालकांसाठी विशेष असतो. लहान मुलांना बालपणापासूनच शेती, बैल आणि प्राण्यांबद्दल आपुलकी व कृतज्ञतेची भावना निर्माण व्हावी, हा या लहान पोळ्याच्या आयोजनामागील मुख्य उद्देश आहे. शहर आणि आसपासच्या परिसरात तान्हा पोळ्याच्या दिवशी विविध क्रीडा मंडळे, सामाजिक संस्था आणि स्थानिक रहिवाशांकडून लाकडी बैल सजवण्यासह,वेशभुषा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. अंबादेवी व एकविरा देवी मंदिर परिसर शहराचा मध्यवर्ती भाग असल्याने या परिसरात आजूबाजूच्या गल्लीबोळांतील लहान मुले आपले सजवलेले लाकडी बैल घेऊन एकत्र येतात. येथे बालकांची मोठी गर्दी शुक्रवारी दिसणार आहे. राजापेठ आणि नेहरू मैदान परिसरात स्थानिक संस्थांतर्फे लहान मुलांसाठी उत्तम सजवलेले बैल, उत्कृष्ट वेशभुषा आणि पारंपरिक देखाव्यांसाठी पारितोषिक वितरण स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. गाडगे नगर व नवसारी भागातील चौक आणि मोकळ्या मैदानांमध्ये तान्ह्या पोळ्याचे आकर्षक मंडप उभारले जाणार असून बाल गोपालांची ढोल ताशांच्या गजरात तान्ह्या बैलांसह मिरवणूक काढली जाणार आहे. मुख्य बाजारपेठ आणि चौकांमध्ये पारंपरिक पद्धतीने तान्हा पोळा आयोजित करण्यात आला असून येथे लहान मुले पारंपरिक पोशाखात सहभागी होणार आहेत. बालपोळ्याला दिवशी लहान मुले आपल्या लाकडी किंवा मातीच्या बैलांना रंगांनी, फुग्यांनी, झुलींनी आणि गळ्यातील घंटी-घुंगरे, मोरपीस, बाशिंग बांधून अतिशय सुंदर सजवणार असून बाजारात लाकडी व मातीचे बैल विक्रीसाठी उपलब्ध असून ते खरेदी करण्यासाठी चांगलीच गर्दी उसळल्याचे गुरुवारी दिसून आले. तान्ह्या पोळ्याला लाकडी बैलांची घरात पूजा केली जाणार आहे. बालकांना बोजारा देण्याची परंपरा आजही कायम तान्हा पोळा आटोपल्यानंतर बालके सजवलेले लाकडी किंवा मातीचे बैल घेऊन येतात. तिथे त्यांच्या बैलांची पूजा करून त्यांना लहान मुलांना पैसे, गोडधोड किंवा भेटवस्तू (ज्याला बोजारा” म्हणतात) दिले जातात. चॉकलेट्स, पेन्सिल दिले जाते. काकडी, खोबऱ्याचा प्रसाद अधिक मानाचा तान्ह्या पोळ्याला लांब हिरवी काकडी कापून त्याचे काप बालकांना प्रसाद म्हणून दिले जातात. तसेच मुख्य चौक किंवा मैदानावरील कार्यक्रमात ”पोळा फुटल्यावर” लहान बालकांना सुक्या खोबऱ्याचा प्रसाद, गुळ, चिरंजी, बत्तासे किंवा साखरेसोबत वाटला जातो. उत्तम सजवलेल्या बैलांना प्रथम, द्वितीय, तृतीय, प्रोत्सहनपर रोख पुरस्कारही दिले जाणार आहेत.
Source link
शहरात आज 12 पेक्षा जास्त ठिकाणी भरणार तान्हा पोळा:मोकळ्या मैदानांमध्ये तान्ह्या पोळ्याचे आकर्षक मंडप उभारले