Headlines

राज्याला पुन्हा झोडपणार!:परतीच्या पावसाचा जोर वाढणार; विदर्भ-मराठवाड्यासह 29 जिल्ह्यांना येलो अलर्ट




गेल्या काही दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने आता पुन्हा एकदा परतीच्या प्रवासाला सुरुवात केली आहे. तो अधिक रौद्ररूप धारण करण्याची चिन्हे आहेत. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले कमी दाबाचे क्षेत्र अधिक सक्रिय झाल्यामुळे महाराष्ट्रात परतीच्या पावसाचा जोर वाढणार आहे. हवामान विभागाने आज राज्यातील बहुतांश भागांत जोरदार वारे, मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाचा अंदाज वर्तवला आहे. विशेषतः विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाचा जोर अधिक राहणार असून, राज्याभरातील तब्बल २९ जिल्ह्यांना हवामान विभागाकडून ‘येलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. बंगालच्या उपसागरात वादळी प्रणाली हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, बंगालच्या उपसागरात ओडिशा आणि आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीजवळ एक तीव्र कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. आज त्याचे रूपांतर ‘डीप डिप्रेशन’मध्ये (अति तीव्र कमी दाबाचे क्षेत्र) होण्याची दाट शक्यता आहे. ही वादळी प्रणाली आज रात्री उशिरा किंवा २४ सप्टेंबरच्या सकाळपर्यंत विशाखापट्टणम आणि गोपाळपूरजवळ किनाऱ्यावर धडकण्याची शक्यता आहे. याशिवाय, आंध्र प्रदेश आणि कर्नाटकपासून आग्नेय अरबी समुद्रापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा कायम असल्याने महाराष्ट्रात पावसाला पोषक वातावरण निर्माण झाले आहे. या जिल्ह्यांना बसणार पावसाचा तडाखा आज मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. धाराशिव, लातूर, नांदेड, यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, गोंदिया आणि गडचिरोली या जिल्ह्यांत पावसाचा जोर सर्वाधिक राहील. तर दुसरीकडे रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, अहिल्यानगर, पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली आणि सोलापूरसह उर्वरित जिल्ह्यांमध्ये ताशी ३० ते ५० किलोमीटर वेगाने वारे वाहतील आणि मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. तापमान आणि मान्सूनचा परतीचा प्रवास राज्यातील तापमानाचा विचार केल्यास, मंगळवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत सोलापूरमध्ये सर्वाधिक ३६.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली, तर महाबळेश्वर येथे सर्वात कमी १८.८ अंश सेल्सिअस तापमान होते. विशेष म्हणजे, घाटमाथ्यावरील भिरा येथे तब्बल १५० मिलिमीटर इतक्या विक्रमी पावसाची नोंद झाली आहे. दरम्यान, राजस्थान, पंजाब आणि हरियानामधील मान्सूनची परतीची सीमा सध्या कायम असली तरी, पुढील दोन ते तीन दिवसांत वायव्य भारताच्या काही भागांतून मान्सून अधिकृतपणे माघारी फिरण्यास सुरुवात होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. छत्रपती संभाजीनगर शहरात 4 दिवस वादळी वाऱ्याचे; त्यापैकी 2 दिवस पावसाची चिन्हे शहर व परिसरात येत्या शनिवारपर्यंत वादळी वारे असतील. त्यापैकी बुधवारी व गुरुवारी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे, असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवला आहे. छत्रपती संभाजीनगर शहरात गेल्या रविवारपासून पाऊस झालेला नाही. शहरातील तापमानातही सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे शहरात उकाडा जाणवत आहे. सोमवारी (२१ सप्टेंबर) शहरातील कमाल तापमान ३५.६ अंश सेल्सियसपर्यंत पोहोचले. मंगळवारी (२२ सप्टेंबर) कमाल तापमान ३४.९ आणि किमान तापमान २४.८ अंश सेल्सियस नोंदवले गेले. १७ सप्टेंबरनंतर या महिन्यात दुसऱ्यांदा किमान तापमान २४.८ अंशांपर्यंत पोहोचले आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविलेल्या अंदाजानुसार २३ आणि २४ सप्टेंबर रोजी मेघगर्जनेसह पाऊस पडेल. त्याकाळात वाऱ्याचा वेग ताशी ३० ते ४० किमी असेल. त्याचबरोबर २५ आणि २६ रोजी शहरात सोसाट्याचा वारा असेल. हेही वाचा.. लडाखला नेपाळसारख्या पुराचा धोका: ग्लेशियर तलावाला गळती, रिअल टाइम निरीक्षण सुरू; दबाव वाढल्यास तलावाला छिद्र पाडून पाणी काढणार लडाखमधील सर्वात मोठ्या द्रांग-द्रुंग हिमनदीच्या मुखाशी तयार झालेल्या तलावातून पाण्याची गळती सुरू झाली आहे. गेल्या काही वर्षांत या तलावाचा विस्तार झपाट्याने वाढला आहे. अशा परिस्थितीत वाडिया हिमालय भूविज्ञान संस्थेचे शास्त्रज्ञ झांस्करमध्ये हिमनदीजवळच तळ ठोकून यावर सतत लक्ष ठेवून आहेत. शास्त्रज्ञ तलावातील पाण्याचे प्रमाण, खोली आणि हिमनदी वितळण्याचा वेग यांचे रिअल-टाइम निरीक्षण करत आहेत. पाण्याची पातळी वाढल्याने तलावावरील दबाव धोकादायक पातळीपर्यंत पोहोचल्यास, सुरक्षित पद्धतीने छिद्र पाडून अतिरिक्त पाणी बाहेर काढण्याचीही तयारी आहे. सविस्तर वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *