Headlines

पाच उमेदवारांना एक अंकी मते मिळाली:अमरावती शिक्षक मतदारसंघात 20 जणांची अनामत रक्कम जप्त




विधान परिषदेच्या अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाचा निकाल जाहीर झाला. निवडणुकीत पाच उमेदवारांना एक अंकी मते मिळाली. एकूण २६ उमेदवारांपैकी २० जणांची अनामत रक्कम जप्त झाली. उमेदवारी अर्जासाठी प्रत्येक उमेदवाराला १० शिक्षकांच्या सह्या आवश्यक होत्या. मात्र, पाच उमेदवारांना त्यांच्या सूचक आणि अनुमोदकांकडूनही प्रथम पसंतीची मते मिळाली नाहीत. खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना अर्ज भरताना १० हजार रुपये, तर राखीव प्रवर्गातील उमेदवारांना ५ हजार रुपये अनामत रक्कम भरावी लागली होती. विजयी उमेदवारासह सर्वाधिक मते मिळवणाऱ्या पहिल्या सहा उमेदवारांना अनामत रक्कम परत मागता येईल. या निवडणुकीत विजयासाठी १६,१३३ मतांचा कोटा निश्चित होता. अनामत रक्कम वाचवण्यासाठी उमेदवाराला पसंतीक्रमानुसार बाद होण्याच्या फेरीत या कोट्याच्या एक षष्ठांश म्हणजे किमान २,६८९ मते मिळवणे आवश्यक होते. २६ पैकी २० उमेदवारांना हा आकडा गाठता आला नाही. अनामत रक्कम परत मागू शकणाऱ्या सहा उमेदवारांमध्ये विजयी शिवसेनेचे किरण सरनाईक (१६,६६३), काँग्रेसच्या अदिती पोहरे (८,६३६), शिवसेनेचे बंडखोर प्रा. श्रीकांत देशपांडे (७,०१७), शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सुरेश देवकर (४,६९८), विमाशिचे प्रा. दिलीप कडू (३,६६९) आणि अपक्ष दत्तात्रय लहाने (२,७१२) यांचा समावेश आहे. एक अंकी मते मिळालेल्या उमेदवारांमध्ये रामदास कड (५), श्रीकृष्ण पहुरकर (६), प्रा. मिलिंद ब्राम्हणे (६), अशोक हिवाळे (६) आणि हेमलता मुनोत (देवडा) (७) यांचा समावेश आहे. या उमेदवारांचे सूचक आणि अनुमोदक पहिल्या पसंतीचे मत देण्याऐवजी वेगळ्या पसंतीचे मत दिल्याचा किंवा त्यांचे मत अवैध ठरल्याचा दावा करू शकतात.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *