![]()
पोखरापूर येथील शेळवणी माळावर श्री. विठ्ठल बिरुदेव व भागूबाई यांच्या पालखीचा पारंपरिक परज सोहळा मंगळवारी (दि. १० नोव्हेंबर) रोजी मोठ्या भक्तिभावाने आणि दिमाखात संपन्न झाला. ढोल-ताशांचा गजर, अब्दागिरी, छत्री, भंडारा, खोबरे आणि लोकरीची उधळण तसेच ‘श्री.
.
पोखरापूर येथील शेळवणी माळावर सत्ययुगापासून वर्षातून दोन वेळा, गुढीपाडवा आणि दीपावली पाडव्याच्या निमित्ताने श्री. विठ्ठल बिरुदेवांचा संचार होण्याची पारंपरिक धार्मिक प्रथा आहे. या परंपरेनुसार पोखरापूर येथील पुजारवाड्यातून भागूबाईच्या पालखीसह ढोल-ताशांच्या गजरात मिरवणूक शेळवणी माळावर दाखल झाली.
दरम्यान, पालखीमध्ये भागूबाईसह श्री. विठ्ठल बिरुदेव यांच्या मूर्ती विराजमान झाल्यानंतर खवणी तसेच नजीकच्या पिंपरी येथील तलवारी दाखल होताच पारंपरिक परज सोहळ्यास प्रारंभ झाला. पोखरापूरच्या श्री. विठ्ठल बिरुदेव यात्रा सोहळ्यात तलवारीचा मान नजीकच्या पिंपरी गावासह खवणी येथील ग्रामदैवत श्री. बिरोबा देवस्थानास आहे. कै. पै. रामचंद्र भोसले (आबा) यांच्या योगदानामुळे खवणी येथील ग्रामदैवत श्री. बिरोबा देवस्थानाचा हा मान आजही अबाधित आहे. नजीकच्या पिंपरी येथील पाटील तसेच खवणी येथील पाटील यांना तलवारी घेऊन येण्याचा पारंपरिक मान आहे. परज सोहळ्यादरम्यान भंडारा, खोबरे आणि लोकरीची उधळण करण्यात आली. ढोल-ताशांच्या निनादात, फटाक्यांच्या आतषबाजीत आणि भाविकांच्या जयघोषात श्री. विठ्ठल बिरुदेवांचा छबिना मोठ्या उत्साहात पार पडला. छबिना सोहळ्यानंतर मंदिरात पारंपरिक भाकणूक करण्यात आली.
पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त यात्रेदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये तसेच महिला भाविकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने मोहोळ पोलीस निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. पोलीस अधिकारी, हवालदार आणि कर्मचाऱ्यांनी यात्रा परिसरातील हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवले. भुरट्या चोरट्यांवर प्रतिबंधात्मक कारवाई करत पोलिसांनी यात्रा सुरळीत पार पाडण्यात यश मिळवले.