![]()
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात (एसटी) लवकरच मोठ्या प्रमाणावर कंत्राटी भरती होणार आहे. मात्र, या भरतीच्या नावाखाली काही खासगी संस्था गरजू आणि बेरोजगार तरुणांना नोकरीचे आमिष दाखवून त्यांची आर्थिक लूट करत असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. याची गंभीर दखल घेत राज्याचे परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी एसटी प्रशासनाला कडक निर्देश दिले आहेत. ‘एसटीच्या कंत्राटी भरती प्रक्रियेत पूर्ण पारदर्शकता राखा आणि उमेदवारांची फसवणूक करणाऱ्या दोषी संस्थांवर तातडीने गुन्हे दाखल करून कठोर कारवाई करा,’ असे आदेश त्यांनी दिले आहेत. एसटीत लवकरच १३,९८० पदांची कंत्राटी भरती एसटी महामंडळात लवकरच सुमारे १३,९८० चालक व यांत्रिकी कर्मचाऱ्यांची कंत्राटी पद्धतीने भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. याबाबत माहिती देताना मंत्री सरनाईक यांनी स्पष्ट केले की, ही भरती प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक आणि नियमानुसारच पार पडली पाहिजे. बाह्य संस्थेमार्फत केली जाणारी उमेदवारांची निवड ही केवळ एसटी महामंडळाने निर्धारित केलेल्या पात्रता निकषांनुसारच व्हावी, याची दक्षता संबंधित संस्थेने आणि एसटी प्रशासनाने घ्यावी. या प्रक्रियेत कोणत्याही उमेदवाराची फसवणूक होणार नाही, याची संपूर्ण जबाबदारी एसटी प्रशासनाचीच असेल, असा सज्जड दमही त्यांनी दिला आहे. नोकरीचे आमिष दाखवणाऱ्या संस्थांवर गुन्हे दाखल करा एसटी महामंडळाच्या नावाचा गैरवापर करून काही खासगी संस्था बेरोजगार तरुणांकडून अवैधरित्या पैसे उकळत असल्याच्या अनेक तक्रारी प्रशासनाकडे प्राप्त होत आहेत. यावर संताप व्यक्त करत मंत्री सरनाईक म्हणाले, “अशा प्रकारांमुळे नोकरीच्या आशेने असलेल्या तरुणांची आर्थिक फसवणूक होत असून, त्याचा थेट परिणाम एसटी महामंडळाच्या प्रतिमेवर होत आहे. काही समाजकंटकांच्या गैरकृत्यांमुळे महामंडळाची जनमानसातील प्रतिमा मलीन होणे ही अत्यंत गंभीर बाब आहे.” सुरक्षा व दक्षता विभागाला चौकशीचे आदेश या पार्श्वभूमीवर, एसटी महामंडळाच्या नावाखाली सुरू असलेल्या अशा बेकायदेशीर प्रकारांची ‘सुरक्षा व दक्षता विभागा’मार्फत सखोल चौकशी करण्यात यावी, असे निर्देश मंत्री सरनाईक यांनी दिले आहेत. तसेच, उमेदवारांची फसवणूक करणाऱ्या संस्था आणि संबंधित व्यक्तींची ओळख पटवून दोषींविरुद्ध तातडीने गुन्हे दाखल करावेत, असेही त्यांनी सांगितले. ‘आर्थिक लूट करणाऱ्यांची गय केली जाणार नाही’ भरती प्रक्रियेच्या नावाखाली बेरोजगार तरुणांची आर्थिक लूट करणाऱ्यांची कोणतीही गय केली जाणार नाही, असा इशारा देतानाच, भरती प्रक्रियेत पारदर्शकता, विश्वासार्हता आणि उमेदवारांच्या हिताचे रक्षण यांना सर्वोच्च प्राधान्य द्यावे, असेही त्यांनी प्रशासनाला स्पष्ट केले आहे. यामुळे आता तरुणांची फसवणूक करणाऱ्या टोळ्यांचे धाबे दणाणले असून, एसटी प्रशासन काय कारवाई करते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ———— हेही वाचा.. छठ पूजेच्या नावाखाली भाजप संघर्ष पेटवतोय, त्यांच्या सापळ्यात अडकू नका: उत्तर प्रदेश निवडणुकीसाठीच हा आटापिटा- राज ठाकरेंचा आरोप
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भारतीय जनता पक्षावर घणाघाती टीका केली आहे. आगामी उत्तर प्रदेश निवडणुकांच्या स्वार्थासाठी भाजप छठ पूजेच्या माध्यमातून महाराष्ट्रात जाणीवपूर्वक संघर्ष निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याचा गंभीर आरोप राज ठाकरे यांनी केला आहे. तसेच, ‘भाजपला कामे दाखवून निवडणुका जिंकता येत नाहीत, त्यामुळे दोन गटांत संघर्ष घडवून त्यांच्या सांडलेल्या रक्तावर ते निवडणुका जिंकतात,’ असा स्फोटक दावाही राज ठाकरे यांनी आपल्या सोशल मीडिया पोस्टद्वारे केला आहे. सविस्तर वाचा
Source link