Headlines

जळगाव जिल्हा बँकेच्या निवडणुकीत महायुतीचे वर्चस्व:गिरीश महाजन, गुलाबराव पाटील बिनविरोध विजयी




लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीनंतर आता जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीतही राजकीय घडामोडींना वेग आला आहे. जळगाव जिल्हा बँकेच्या निवडणुकीत महायुतीने एकत्रितपणे ताकद दाखवण्याची रणनीती आखली असून, त्याचा परिणाम उमेदवारी अर्ज माघारीच्या दिवशी पाहायला मिळाला. राज्याचे मंत्री तथा भाजप नेते गिरीश महाजन आणि शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील हे दोघेही बिनविरोध निवडून आले आहेत. भाजप कार्यकर्ते तुकाराम विठोबा निकम यांनी गिरीश महाजन यांना पाठिंबा देत उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने महाजन यांच्या बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला. तर गुलाबराव पाटील यांच्या विरोधातील उमेदवारांनीही माघार घेतल्याने त्यांची निवड बिनविरोध झाली. जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीकडे जिल्ह्यातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले होते. या बँकेवर वर्चस्व मिळवण्यासाठी महायुतीतील घटक पक्षांसह विविध राजकीय गटांनी तयारी केली होती. भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षांनी एकत्रित निवडणूक लढवण्याची भूमिका घेतली. मंत्री गिरीश महाजन यांनीही महायुती म्हणून ही निवडणूक लढवणार असल्याचे यापूर्वी स्पष्ट केले होते. त्यानुसार उमेदवारी अर्ज माघारीच्या टप्प्यावर महायुतीतील समन्वय दिसून आला. गिरीश महाजन यांच्या विरोधातील निकम यांची माघार जामनेर मतदारसंघातून मंत्री गिरीश महाजन यांच्यासह रघुनाथ पाटील आणि भाजप कार्यकर्ते तुकाराम विठोबा निकम यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. त्यामुळे या मतदारसंघातील निवडणुकीकडे विशेष लक्ष होते. मात्र, सुरुवातीपासूनच या लढतीत वेगवेगळ्या घडामोडी घडत होत्या. रघुनाथ पाटील यांचा उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी बाद ठरवला होता. या निर्णयाला आव्हान देत त्यांनी नाशिक येथील सहाय्यक निबंधक कार्यालयात हरकत दाखल केली होती. मात्र, तेथेही त्यांना दिलासा मिळाला नाही आणि त्यांचा अर्ज फेटाळण्यात आला. त्यामुळे गिरीश महाजन यांच्याविरोधात मैदानात असलेले तुकाराम निकम काय भूमिका घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी निकम यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेत महाजन यांना पाठिंबा जाहीर केला. ‘आपण गिरीश भाऊ यांच्या पाठीशी आहोत,’ अशी भूमिका त्यांनी मांडली. त्यांच्या माघारीमुळे जामनेर मतदारसंघातून गिरीश महाजन यांची बिनविरोध निवड निश्चित झाली. गुलाबराव पाटील यांचाही विजयाचा मार्ग मोकळा दुसरीकडे, मंत्री गुलाबराव पाटील यांच्याबाबतही अशीच राजकीय घडामोड पाहायला मिळाली. जळगाव तालुका विविध कार्यकारी सोसायटी मतदारसंघातून गुलाबराव पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यांच्या विरोधात भाजपच्या माजी महापौर जयश्री महाजन, शिवसेनेचे माजी उपमहापौर कुलभूषण पाटील आणि भाजपचे प्रभाकर सोनवणे यांनी अर्ज दाखल केले होते. मात्र, महायुतीतील समन्वय कायम ठेवण्यासाठी भाजपच्या उमेदवारांनी माघार घ्यावी, अशा सूचना मंत्री गिरीश महाजन यांनी केल्याचे सांगितले जात आहे. त्यानुसार जयश्री महाजन आणि प्रभाकर सोनवणे यांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले. गुलाबराव पाटील यांच्या विरोधातील तिन्ही उमेदवारांनी माघार घेतल्याने त्यांचीही बिनविरोध निवड झाली. त्यामुळे जिल्हा बँकेतील महायुतीच्या राजकीय समीकरणांना बळ मिळाले आहे. महायुतीतील तिन्ही पक्षांचा एकत्रित निर्णय जळगाव जिल्हा बँकेच्या निवडणुकीत भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या महायुतीतील तिन्ही पक्षांनी एकत्रित भूमिका घेतल्याचे चित्र आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या जयश्री पाटील, भाजपचे मंत्री गिरीश महाजन आणि शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील हे बिनविरोध निवडून आले आहेत. उमेदवारी अर्ज माघारीच्या प्रक्रियेत झालेल्या घडामोडींमुळे महायुतीतील अंतर्गत समन्वयही स्पष्ट झाला आहे. लातूर जिल्हा बँकेच्या निवडणुकीत सहकार पॅनेलने 19 पैकी 14 जागा जिंकत सत्ता मिळवली होती. आता जळगाव जिल्हा बँकेच्या निवडणुकीत महायुतीने बिनविरोध निवडीच्या माध्यमातून आपली ताकद दाखवली आहे. त्यामुळे आगामी काळात जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सत्तेची समीकरणे कशी आकाराला येतात आणि बँकेच्या कारभारात कोणाचे वर्चस्व राहते, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. हेही वाचा.. बाळासाहेब ठाकरेंचा स्मृतिदिन, उपमुख्यमंत्री शिंदेंकडून अभिवादन: म्हणाले- शेतकऱ्यांना कुठेही कमी पडू देणार नाही, दुष्काळात शिवसेना खंबीरपणे पाठीशी शिवसेनाप्रमुख, हिंदुहृदयसम्राट दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त आज शिवतीर्थावर जाऊन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना विनम्र अभिवादन केले. यावेळी माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी बाळासाहेबांचे विचार, त्यांची शिकवण आणि सध्या राज्यातील दुष्काळी परिस्थितीवर शिवसेनेची आणि सरकारची भूमिका स्पष्ट केली. बाळासाहेबांच्या विचारांचे सरकार या महाराष्ट्रात काम करत असून, राज्यात सध्या दुष्काळाचे मोठे संकट असले तरी शिवसेना कुठेही कमी पडणार नाही आणि शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही,” अशी ग्वाही शिंदेंनी दिली. सविस्तर वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *