![]()
दहिहंडी उत्सवादरम्यान पिस्तुलाचा वापर करून परिसरात दहशत निर्माण केल्याप्रकरणी पुणे पोलिसांनी कंचीले टोळीवर मोक्का लावला आहे. टोळीप्रमुख आकाश कंचीलेसह नऊ जणांवर ही कारवाई झाली. कोंढवा पोलिसांची चालू वर्षातील ही पाचवी मोक्का कारवाई आहे. कारवाई झालेल्यांमध्ये आकाश वसंत कंचीले (रा. लक्ष्मीनगर, येरवडा; सध्या फरार), दिनेश रामदास घाडगे (वय २५, रा. कोंढवा खुर्द), कार्तिक महादेव पांडागळे (वय १९, रा. कोंढवा खुर्द) आणि विजय रामदास चौंधे (वय १८, रा. येवलेवाडी, कोंढवा बु.) यांचा समावेश आहे. तसेच जितेंद्र उर्फ दादू जालिंदर भालेराव (वय २२, रा. अंतुलेनगर, येवलेवाडी), लक्ष्मण उर्फ सोनू उर्फ जांभ्या शिवाजी गजरमल (वय २६, रा. येरवडा; सध्या कोंढवा खुर्द), प्रज्वल उर्फ पज्या बापू कदम (वय २६, रा. येरवडा), धम्मा शशिकांत साळवे (वय २०, रा. अंतुलेनगर, पिसोळी; फरार) आणि आर्यन थोरात (फरार) यांच्यावरही कारवाई झाली आहे. टोळीने कोंढवा पोलीस ठाण्याच्या हद्दीत दहिहंडी उत्सवादरम्यान बंदुकीचा वापर केला होता. याप्रकरणी भारतीय न्याय संहिता, आर्म्स अॅक्ट आणि महाराष्ट्र पोलीस कायद्यातील विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासात आकाश कंचीले आणि त्याच्या अन्य चार साथीदारांवर येरवडा, कोंढवा, लोणी काळभोर आणि विमानतळ पोलीस ठाण्यांत यापूर्वीही अनेक गंभीर गुन्हे दाखल असल्याचे समोर आले. टोळीप्रमुखासह तिघे जण अद्याप फरार असून, पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सहपोलीस आयुक्त संजय दराडे, अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उपआयुक्त राजलक्ष्मी शिवणकर आणि सहायक पोलीस आयुक्त रामदास इंगवले यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई झाली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष खेतमाळस, पोलीस निरीक्षक (गुन्हे) प्रशांत मंडले आणि संतोष चौधरी यांच्या सूचनेनुसार उपनिरीक्षक रवींद्र गावडे, शेखर कोळी आणि पोलीस अंमलदार एकोर्गे, चव्हाण व माने यांच्या पथकाने कारवाई केली.
Source link
दहिहंडीतील गोळीबारानंतर कंचीले टोळीवर मोक्का:आकाश कंचीलेसह नऊ जणांवर कारवाई; कोंढवा पोलिसांची यंदाची पाचवी मोक्का कारवाई