![]()
स्वातंत्र्याचे खरे भान असणारी माणसेच समाजाला अधिक सक्षम करतात, असे प्रतिपादन माजी परराष्ट्र सचिव ज्ञानेश्वर मुळे यांनी केले. एकवीरा मल्टिपर्पज फाउंडेशनच्या (अकोला) सुचेता बनसोड यांनी वंचित आणि गरजू घटकांच्या सक्षमीकरणासाठी परिवर्तनाची चळवळ सुरू केली, असेही ते म्हणाले. फाउंडेशनच्या सामाजिक योगदानाचा गौरव करणारा चौथा ‘प्रभास सन्मान’ सोहळा शुक्रवारी सायंकाळी अमरावतीतील श्याम चौक येथील जोशी हॉलमध्ये झाला. यावेळी मुळे बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अमरावतीच्या स्वानंद समुपदेशन केंद्राच्या संचालिका आणि ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या डॉ. मोहना कुळकर्णी होत्या. प्रमुख पाहुण्या म्हणून डॉ. साधना शंकर उपस्थित होत्या. पुरस्कारार्थी सुचेता आणि श्रीकांत बनसोड तसेच पुरस्कार निवड समितीचे प्रमुख प्राचार्य डॉ. अविनाश मोहरील (पुणे) यांचीही उपस्थिती होती. मुळे म्हणाले, “राज्यघटना हा भारताचा सर्वोच्च ग्रंथ आहे. त्यात प्रत्येकाच्या वागण्या-बोलण्याची आणि आचरणाची संहिता दिली आहे. आपण बोलताना संविधानाचा आदर करतो; मात्र त्यानुसार वागत नाही. संविधानाशी सुसंगत वर्तन करणे हे सर्वांचे कर्तव्य आहे.” यासाठी बनसोड दाम्पत्यासारखे काहीतरी वेगळे करण्याचे आवाहन त्यांनी केले. अध्यक्षीय भाषणात डॉ. मोहना कुळकर्णी यांनी बनसोड दाम्पत्याच्या सेवाभावी कामाचे कौतुक केले. स्वतःला समाजासाठी समर्पित करणाऱ्या व्यक्तींचे काम समाजाला दिशा देते, असे त्या म्हणाल्या. सुचेता आणि श्रीकांत बनसोड यांनी वंचित आणि गरजू घटकांना आधार देऊन त्यांना आत्मनिर्भर करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. अडचणींकडे तक्रार म्हणून न पाहता समस्या म्हणून स्वीकारल्यास त्यावर उपाय शोधता येतो, हा दृष्टिकोन त्यांनी कामातून दाखवून दिला, असे कुळकर्णी म्हणाल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. अविनाश मोहरील यांनी केले. वसुंधरा काशिकर यांनी सूत्रसंचालन केले. रसिका वडवेकर यांनी सन्मानपत्राचे वाचन केले, तर सर्वेश मराठे यांनी आभार मानले. कार्यक्रमाला माजी पालकमंत्री डॉ. सुनील देशमुख, राज्याचे सेवा हक्क आयुक्त अरुण डोंगरे, महाबीजचे महाव्यवस्थापक दिलीप स्वामी, माजी खासदार अनंत गुढे, उपमहापौर निलेश भेंडे, शिक्षणतज्ज्ञ डॉ. अनंत मराठे आणि ईएनटी तज्ज्ञ डॉ. बबन बेलसरे यांच्यासह शहरातील मान्यवर उपस्थित होते.
Source link
ज्ञानेश्वर मुळे यांनी समाजसेवेचे महत्त्व सांगितले:‘स्वातंत्र्याचे भान असणारी माणसे समाजाला सक्षम करतात’; एकवीरा फाउंडेशनच्या सुचेता बनसोड यांना ‘प्रभास’ सन्मान