![]()
शारीरिक व्यंगापलीकडे जाऊन व्यक्तीचे मन, विचार आणि कर्तृत्व यांना महत्त्व देणारा प्रेरणादायी विवाह सोहळा कार्तिकी एकादशीच्या मुहूर्तावर श्रीरामपूर येथे उत्साहात पार पडला. येथील दिव्यांग दर्शना पापडीवाल आणि जयपूर (राजस्थान) येथील अंकित सोमानी यांचा विव
.
गोकुळ पापडीवाल व स्व. विजया पापडीवाल यांची कन्या दर्शना हिच्या शारीरिक हालचालींवर अस्थिव्यंगामुळे मर्यादा आहेत. आईचे छत्र हरपल्यानंतरही भाऊ विशाल व सागर यांच्या भक्कम साथीने तिने आव्हानांवर मात केली. त्या ‘आसान दिव्यांग संघटने’च्या सक्रिय सभासद आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांची जयपूर येथील अंकित सोमानी यांच्याशी ओळख झाली. विचारांची देवाणघेवाण आणि परस्पर समंजसपणातून दोघांनी सहजीवनाचा निर्णय घेतला. स्वतः सुदृढ असूनही दिव्यांग तरुणीला जीवनसाथी म्हणून स्वीकारत अंकित यांनी समाजासमोर नवा आदर्श ठेवला आहे.
गुजराती मंगल कार्यालयात पार पडलेल्या या सोहळ्यात दर्शना यांनी जीवनसाथीच्या सोबतीने वॉकरच्या साहाय्याने चालण्याचा प्रयत्न केला, तेव्हा उपस्थितांचे डोळे पाणावले.
दिव्यांग व्यक्तींना सहानुभूतीपेक्षा आत्मविश्वासाने जगण्यासाठी मानसिक पाठबळ आणि समानतेची गरज असल्याचा संदेश या सोहळ्याने दिला. याप्रसंगी माजी नगराध्यक्षा राजश्री ससाणे, संजय छल्लारे, वर्षा गायकवाड, साधना चुडिवाल, जिजामाता तरुण मंडळाचे सदस्य व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन संजय कासलीवाल आणि अनिल पांडे यांनी केले.
आजपर्यंत १६ सुदृढ- दिव्यांग विवाहांचा विक्रम श्रीरामपूर येथील मूकबधिर विद्यालयाचे वैद्यकीय सामाजिक अधिकारी व अपंग सामाजिक विकास संस्थेचे चेअरमन संजय साळवे यांनी आजपर्यंत १६ सुदृढ-दिव्यांग विवाह घडवून आणले आहेत. त्यांच्या या सातत्यपूर्ण चळवळीमुळे दिव्यांग व्यक्तींच्या विवाहाचा प्रश्न केवळ सहानुभूतीचा न राहता समान संधी आणि सामाजिक स्वीकाराचा बनला आहे. दर्शना आणि अंकितच्या विवाहाने या सामाजिक चळवळीला नवे बळ मिळाले आहे.