नामांकित कॅस्ट्रॉल (Castrol) कंपनीच्या नावाचा वापर करून बनावट इंजिन ऑइलची साठवणूक आणि विक्री करणाऱ्या रॅकेटचा वसईत पर्दाफाश झाला आहे. वसई पश्चिमेतील सनसिटी रोड परिसरात माणिकपूर पोलिसांनी छापेमारी करत बनावट इंजिन ऑइलच्या 680 बाटल्या जप्त केल्या आहेत.
.
मिळालेल्या माहितीनुसार, नेट्रिका कन्सल्टिंग इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचे फिल्ड ऑफिसर विनोद सुमरा आणि अक्षय वंजारे यांना वसई पश्चिम परिसरात कॅस्ट्रॉल कंपनीच्या नावाखाली बनावट इंजिन ऑइलचा साठा करून त्याची विक्री केली जात असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. या माहितीची खातरजमा केल्यानंतर त्यांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली. त्यानुसार 23 नोव्हेंबर 2026 रोजी सायंकाळी माणिकपूर पोलिसांनी सनसिटी रोडवरील जी.जी. सदन इमारतीतील गाळा क्रमांक 01 आणि 06 येथे छापेमारी केली.

या कारवाईदरम्यान संबंधित गाळ्यांमध्ये बनावट इंजिन ऑइलचा मोठ्या प्रमाणात साठा आढळून आला. पोलिसांनी तपासणी केली असता एकूण 34 बॉक्समध्ये भरलेल्या 680 बाटल्या जप्त करण्यात आल्या. यामध्ये कॅस्ट्रॉल ॲक्टिव्ह या ब्रँडच्या 14 बॉक्समधील 280 बाटल्यांचा समावेश होता. या बाटल्यांची किंमत 1 लाख 60 हजार 440 रुपये असल्याचे सांगण्यात आले. तर कॅस्ट्रॉल जीटीएक्स इसेन्शियलच्या 20 बॉक्समध्ये 400 बाटल्या आढळल्या. त्यांची किंमत 1 लाख 26 हजार 800 रुपये आहे. अशा प्रकारे पोलिसांनी दोन्ही प्रकारच्या इंजिन ऑइलसह एकूण 2 लाख 87 हजार 240 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
या प्रकरणी हितेश नथालाल मोदी याच्याविरोधात माणिकपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कॉपीराइट कायदा 1957 मधील कलम 51 आणि 63 अन्वये एफआयआर क्रमांक 590/2026 नोंदवण्यात आला असून, पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. पोलीस उपनिरीक्षक चुडामण व्यंकटराव मोरे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
बनावट ऑइलमुळे वाहनांच्या इंजिनला धोका
दरम्यान, वाहनांमध्ये वापरल्या जाणाऱ्या इंजिन ऑइलचा दर्जा अत्यंत महत्त्वाचा असतो. इंजिन ऑइल बनावट किंवा निकृष्ट दर्जाचे असल्यास वाहनाच्या इंजिनच्या कार्यक्षमतेवर परिणाम होऊ शकतो. तसेच इंजिनमधील विविध भागांची झीज होऊन मोठे नुकसान होण्याची शक्यता असते. त्यामुळे ग्राहकांनी केवळ ब्रँडचे नाव आणि पॅकिंग पाहून इंजिन ऑइल खरेदी करू नये. अधिकृत विक्रेत्यांकडूनच पक्के बिल घेऊन ऑइल खरेदी करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
पुरवठ्याचे नेटवर्क शोधण्याचे पोलिसांसमोर आव्हान
या कारवाईत बनावट इंजिन ऑइलचा साठा जप्त झाला असला, तरी हा माल नेमका कुठून आणण्यात आला होता, त्याची निर्मिती कुठे केली जात होती आणि वसईसह इतर भागांत त्याची विक्री केली जात होती का, याचा तपास आता पोलिसांकडून केला जात आहे. या प्रकरणामागे आणखी कोणाचा सहभाग आहे का, तसेच बनावट ऑइलच्या विक्रीचे मोठे नेटवर्क कार्यरत आहे का, याचाही शोध घेतला जात आहे. त्यामुळे तपासातून या रॅकेटबाबत आणखी महत्त्वाची माहिती समोर येण्याची शक्यता आहे.
हेही वाचा….
‘अदानी ग्रीन एनर्जीला ब्लॅकलिस्ट करून तारळी प्रकल्प रद्द करा’:सयाजी शिंदेंचा एल्गार, थेट पोवाडा गात सरकारवर साधला निशाणा

विकासाच्या नावाखाली पर्यावरणीय नियम आणि महसुली कायद्यांना हरताळ फासला जात असेल, तर त्याची किंमत शासन आणि स्थानिक जनतेने का मोजायची? असा सवाल उपस्थित करत अभिनेते सयाजी शिंदे यांनी पाटण तालुक्यातील तारळी उदंचन जलविद्युत प्रकल्पाच्या कारभाराविरोधात कायदेशीर लढा उभारला आहे. अदानी ग्रीन एनर्जी लिमिटेडच्या 1,500 मेगावॅट क्षमतेच्या या प्रकल्पात गंभीर अनियमितता झाल्याचा आरोप करत त्यांनी संबंधित यंत्रणांच्या कार्यक्षमतेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. तसेच “लई झाली आता दिरंगाई, कुणाकुणावर करणार कारवाई?” असा एक पोवाडा सादर करत त्यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. सविस्तर वाचा…..