![]()
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत होणाऱ्या माहिती तंत्रज्ञान विभागातील पदांच्या भरती परीक्षेचा चेहरामोहरा बदलण्याची तयारी राज्य सरकारने सुरू केली आहे. पारंपरिक संगणकविषयक ज्ञानाऐवजी कृत्रिम बुद्धिमत्ता, मशीन लर्निंग, डेटा ॲनालिटिक्स, बिग डेटा, क्लाउड कम
.
इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्ता विभागाने गुरुवार २६ नोव्हेंबर २०२६ रोजी यासंदर्भातील शासन निर्णय जारी केला आहे. विभागाच्या आकृतिबंधातील विश्लेषक व प्रोग्रामर, सॉफ्टवेअर प्रोग्रामर व इन्फॉर्मॅटिक्स असिस्टंट या तीन पदांसाठी एमपीएससी मार्फत भरती केली जाणार आहे. या पदांसाठी स्वतंत्र व पदनिहाय अभ्यासक्रम निश्चित करण्याची जबाबदारी समितीवर सोपविण्यात आली आहे.
उमेदवारांची कसोटी लागणार
सरकारी कामकाजात एआय, क्लाउड आणि सायबर सुरक्षेचा वापर वाढत असल्याने केवळ पदवीधारक नव्हे, तर कॉर्पोरेट क्षेत्रातील “इंडस्ट्री रेडी’ तांत्रिक मनुष्यबळ सरकारला हवे आहे. एमपीएससीच्या परीक्षांमध्ये बहुपर्यायी प्रश्नांसोबतच प्रत्यक्ष संगणकाधारित किंवा प्रात्यक्षिक चाचणी घेण्याचा सरकारचा मानस असून, त्यामुळे जुन्या पद्धतीने अभ्यास करणाऱ्या उमेदवारांची कसोटी लागणार आहे.
नियुक्त केलेल्या समितीमध्ये हे विविध तज्ज्ञ असणार
अध्यक्ष : आयुक्त, इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्ता विभाग, शैक्षणिक तज्ज्ञ: आयआयटी मुंबई, व्हिजेटीआय मुंबई, सीओईपी, पुणे आणि IISER पुणे येथील नामनिर्देशित तज्ज्ञ, औद्योगिक तज्ज्ञ: इन्फोसिस आणि टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसचे वरिष्ठ तांत्रिक प्रतिनिधी, शासकीय प्रतिनिधी: उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे उपसचिव आणि आयटी विभागाचे उपसचिव (सदस्य-सचिव) यामध्ये असतील.
सायबर सिक्युरिटी टूल्सही
केवळ सैद्धांतिक ज्ञानाची परीक्षा घेणे पुरेसे ठरणार नाही, अशी भूमिका शासनाने घेतली आहे. उमेदवारांची प्रोग्रामिंग कौशल्ये, विश्लेषण क्षमता, तांत्रिक समज, तार्किक विचार आणि प्रत्यक्ष समस्या सोडविण्याची क्षमता तपासली जाणार आहे. यासाठी नामांकित आयटी कंपन्यांमध्ये वापरल्या जाणाऱ्या प्रोग्रामिंग लँग्वेजेस, सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट फ्रेमवर्क, डेटाबेस टूल्स, क्लाउड प्लॅटफॉर्म आणि सायबर सिक्युरिटी टूल्सचा समावेश होईल.
हा निर्णय महत्त्वाचा कशामुळे
शासकीय यंत्रणा आधुनिक करण्यासाठी एप्रिल २०२६ मध्ये स्वतंत्र आयटी व ए आय विभागाचा आकृतिबंध मंजूर झाला होता. त्यातील महत्त्वाची तांत्रिक पदे एमपीएससीद्वारे भरताना खासगी आयटी कंपन्यांमधील प्रत्यक्ष टूल्स अभ्यासक्रमात समाविष्ट केले जातील. यामुळे निवड होणारे अधिकारी पहिल्या दिवसापासून प्रगत तांत्रिक प्रकल्प हाताळण्यास सक्षम असतील.
१५ दिवसांत अहवाल
परीक्षेतील विषयवार गुणविभाजन, प्रश्नसंख्या, कालावधी, गुणांकन पद्धती व प्रश्नपत्रिकेचे स्वरूप समिती निश्चित करेल. बहुपर्यायी, परिस्थितीआधारित व समस्या निराकरणविषयक प्रश्नांसह संगणकाधारित किंवा प्रात्यक्षिक चाचणीचा पर्याय विचारात घेतला जाईल. समितीने १५ दिवसांत शासनाला अहवाल सादर करायचा असून, एमपीएससीच्या आयटी संवर्गातील आगामी भरती परीक्षा आधुनिक तंत्रज्ञानानुसार होण्याची शक्यता आहे.