Headlines

अकोटच्या वैभवात पडणार भर; मेळघाटच्या संकल्पनेवरील ‘नमो उद्यान’ अंतिम टप्यात: प्रभाग 17 मधील 14.5 हजार चौरस फुटांच्या जागेत उभारणी


.

शहरातील नागरिकांना दर्जेदार, निसर्गरम्य व आरोग्यदायी विरंगुळ्याचे ठिकाण उपलब्ध व्हावे. यासाठी अकोट नगरपरिषदेकडून विकसित करण्यात येत असलेले ‘नमो उद्यान’ पूर्णत्वाच्या टप्प्यात पोहोचले आहे. मेळघाट अभयारण्याच्या संकल्पनेवर आधारित उद्यान उभारले आहे. येथे निसर्ग, मनोरंजन, व्यायाम आणि पर्यावरण संवर्धनाचा सुंदर संगम अनुभवायला मिळणार आहे. येत्या काही दिवसांत हे उद्यान अकोटकरांच्या सेवेत दाखल होणार आहे. यामुळे शहराच्या सौंदर्य व वैभवात भर पडणार आहे.

प्रभाग क्रमांक १७ मधील चक्रधर कॉलनी परिसरात १४ हजार ५७२ चौरस फुटांच्या क्षेत्रावर हे उद्यान साकारले आहे. वैशिष्ट्यपूर्ण योजनेंतर्गत विकसित होणाऱ्या या उद्यानासाठी १२ फेब्रुवारी २०२६ रोजी नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेत ठराव घेण्यात आला होता. त्यानंतर १२ मार्च रोजी तांत्रिक मान्यता मिळाली. २८ मार्च रोजी प्रशासकीय मान्यता मिळाली. ३ जुलै रोजी कामाचा कार्यारंभ आदेश देण्यात आला. नियोजनबद्ध प्रक्रियेतून उभे राहिलेले हे उद्यान आता अंतिम टप्प्यात आहे. या उद्यानाचे सर्वांत मोठे वैशिष्ट्य म्हणजे त्याची मेळघाट अभयारण्यावर आधारित संकल्पना. उद्यानाचे प्रवेशद्वार शहानूर येथील ऐतिहासिक नरनाळा दरवाजाच्या प्रतिकृतीवर आधारित आहे.

प्लास्टिकचा पुनर्वापर, दिव्यांगांसाठी रेलिंग, व्हीलचेअर उद्यानात पर्यावरण संवर्धनालाही प्राधान्य देण्यात आले आहे. घनकचरा संकलनातून प्राप्त होणाऱ्या प्लास्टिकचा पुनर्वापर करत ते वितळवून डांबरामध्ये वापरण्याची संकल्पना राबवण्यात आली आहे. कंपोस्ट पॉटची व्यवस्था, फाउंटनमध्ये पाण्याचा पुनर्वापर व विजेसाठी संपूर्ण सोलर सिस्टिमचा वापर ही या उद्यानाची वैशिष्ट्ये आहेत. विविध ऋतूंमध्ये हिरवेगार राहणारे, सावली देणारे वृक्ष आणि वनौषधींची लागवडही केली आहे.

आरोग्यदायी, विरंगुळ्याचे ठिकाण ^उद्यानामुळे शहराच्या सौंदर्यात भर पडण्यासोबतच नागरिकांना आरोग्यदायी व आनंददायी विरंगुळ्याचे ठिकाण मिळणार आहे. उद्यानाची देखभाल व स्वच्छता कायम राखण्यावरही भर दिला जाईल. विभागीय स्पर्धेत अकोटच्या नमो उद्यानाला अव्वल स्थान मिळवून देण्यासाठी आमचे प्रयत्न राहतील. – मायाताई धुळे, नगराध्यक्षा, अकोट नगरपरिषद.

पहिल्या क्रमांकासाठी संधी; पाच कोटींच्या निधीचे असणार लक्ष्य राज्यातील ३९४ नगरपरिषद व नगरपंचायतींमध्ये नमो उद्यान विकसित करण्याची योजना राबवण्यात येत आहे. नव्याने विकसित झालेल्या उद्यानांमध्ये विभागीय स्तरावर स्पर्धा घेतली जाणार आहे. प्रत्येक प्रशासकीय विभागातून तीन उद्यानांची निवड करण्यात येणार आहे. प्रथम क्रमांक मिळवणाऱ्या नगरपरिषदेला वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर होणार आहे.

देखभालीसाठी संयुक्त व्यवस्था; ^उद्यानाची निर्मिती झाल्यानंतर त्याची गुणवत्ता व स्वच्छता कायम राखणे महत्त्वाचे आहे. यासाठी अकोट नगरपरिषद कर्मचारी व संकटमोचन हनुमान मंदिर ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने उद्यानाची देखभाल केली जाणार आहे. अभिप्राय नोंदवता यावेत, यासाठी पुस्तिकाही ठेवण्यात येणार आहे.- अभिषेक गोतरकर, नगरअभियंता, न.प., अकोट.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *