Headlines

आंदोलन:जरांगे यांच्या आंदोलनास पाठिंबा,‎मनमाडला एक तास चक्काजाम‎, सकल मराठा समाजातर्फे एकात्मता चौकात साखळी उपाेषण‎




मराठा आरक्षणासह विविध मागण्यांसाठी अंतरवाली सराटी येथे उपोषणाला बसलेले मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी सकल मराठा समाजातर्फे शनिवारी (दि.५) दुपारी शहरातून जाणाऱ्या मनमाड- शिर्डी राष्ट्रीय महामार्गावर १ तास चक्का जाम आंदोलन करण्यात आले. आंदोलनामुळे या राष्ट्रीय महामार्गावरची दुतर्फा वाहतूक मोठ्या प्रमाणावर ठप्प झाली. एक मराठा, लाख मराठा अशा घोषणा देत सकल मराठा समाज मनमाडसह येवला, नांदगाव तालुक्यातील मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. दरम्यान, याच प्रश्नावर सकल मराठा समाज तर्फे एकात्मता चौकात साखळी आंदोलन सुरू आहे. शनिवारी (दि.५) सकाळी आंदोलनस्थळी मोठ्या संख्येने सकल मराठा समाज बांधव संघटित झाले. व त्यांनी एक मराठा, लाख मराठा अशा घोषणा देत भगवे झेंडे फडकावत शहरातून रॅली काढली, विविध मार्गाने जाऊन इंदूर -पुणे राष्ट्रीय महामार्ग अंतर्गत मनमाड – शिर्डी मार्गावर जयश्री टॉकीज समोर रास्ता रोको सुरू केले. यावेळी घोषणांनी परिसर दणाणून गेला. आंदोलनात सकल मराठा समाज बांधव आणि महिलांची उपस्थिती लक्षवेधी होती. यावेळी मराठा बांधवांसह विविध राजकीय पक्ष, संस्था, संघटना, कार्यकर्ते, पदाधिकारी व समाज बांधवांनी मनोगत व्यक्त करतांना मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला. एक तास राष्ट्रीय महामार्गावर चक्का जाम सुरू असल्याने रस्त्याच्या दोन्ही बाजुंनी वाहनाच्या रांगा लागल्या सकल मराठा समाजातर्फे तहसीलदार सुनिल सौंदाणे यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. महिलांच्या हस्ते हे निवेदन देण्यात आले. यावेळी मराठा समाज बांधव उपस्थित होते. पोलिस उपअधिक्षक रोशन पंडित यांच्या नेतृत्वाखाली बंदोबस्त ठेवण्यात आला होता. समाजाच्या न्याय व प्रलंबित मागण्यांसाठी मनोज जरांगे हे उपोषणाला बसले आहे. समाजाच्या भावना आणि मागण्यांची शासनाने गंभीर दखल घ्यावी, कोणताही विलंब न करता मागण्यांवर तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, आणि तो अंमलात आणावा. जरांगे यांच्या प्रकृतीचा विचार करून शासनाने तातडीने पावले उचलावी या प्रश्नावर कायम स्वरूपी सकारात्मक तोडगा काढावा, अशी मागणी निवेदनात करण्यात आली.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *