![]()
पवित्र श्रावण महिन्याच्या चौथ्या आणि अंतिम शनिवारी खुलताबाद येथील श्री भद्रा मारुती मंदिरात भाविकांचा जनसागर उसळला. श्रावण समाप्तीची पूर्वसंध्या आणि श्रावणी शनिवारचा दुग्धशर्करा योग साधत पहाटेपासूनच मारुतीरायांच्या दर्शनासाठी भक्तांच्या मैलोन्मैल लांब रांगा लागल्या होत्या. महाराष्ट्रासह इतर राज्यांतून आलेल्या लाखो भाविकांच्या जय श्रीराम आणि बजरंग बली की जयच्या गजराने संपूर्ण मंदिर परिसर, प्रमुख रस्ते, बाजारपेठ आणि खुलताबाद शहर भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघाले होते. श्रावण महिन्यात निद्रिस्त अवस्थेतील श्री भद्रा मारुतीचे दर्शन घेणे फलदायी मानले जाते. यामुळेच यंदा श्रावणाच्या पहिल्या शनिवारपासूनच भाविकांचा ओघ मोठा होता. पहिल्या शनिवारी साडेचार लाख, दुसऱ्या शनिवारी साडेपाच लाख, तर तिसऱ्या शनिवारी तब्बल सहा लाख भाविकांनी दर्शन घेतले होते. चौथ्या व शेवटच्या शनिवारीही पहाटेपासूनच गर्दीचा आलेख उंचावला आणि दिवसभरात चार ते साडेचार लाख भाविकांनी भद्रा मारुतीचे दर्शन घेतले. श्रावण महिन्यातील लाखोंच्या भाविकांच्या आगमनाचा अत्यंत सकारात्मक परिणाम खुलताबादच्या स्थानिक अर्थव्यवस्थेवर दिसून आला. मंदिर परिसरातील फुलविक्रेते, प्रसाद, नारळ, पूजेचे साहित्य, हॉटेल, उपाहारगृहे, चहाच्या टपऱ्या, खाद्यपदार्थांचे स्टॉल आणि वाहतूकदारांना मोठा व्यवसाय मिळाला. चारही शनिवारी मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल झाली. लाखोंच्या संख्येने भाविक शहरात दाखल झाल्याने खासगी वाहने, एसटी बस आणि दुचाकींची मोठी वर्दळ निर्माण झाली होती. प्रमुख रस्त्यांवर वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून पोलिसांनी वाहतुकीचे मार्ग बदलून पार्किंगची स्वतंत्र व्यवस्था शहराबाहेर केली होती. पोलिस आणि स्वयंसेवकांनी दिवसभर वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी परिश्रम घेतले. भक्ती, श्रद्धा आणि धार्मिक उत्साहात पार पडलेल्या या सांगतेमुळे यंदाचा श्रावण महिना खुलताबाद शहरासाठी अत्यंत खास आणि वैशिष्ट्यपूर्ण ठरला आहे. शेवटच्या शनिवारी होणारी संभाव्य प्रचंड गर्दी लक्षात घेऊन मंदिर संस्थान, स्थानिक प्रशासन आणि पोलिस यंत्रणेने पूर्वतयारी केली होती. भाविकांना सुलभ दर्शन व्हावे म्हणून पुरुषांसाठी दोन आणि महिलांसाठी दोन अशा एकूण चार दर्शन रांगांची सोय करण्यात आली होती. दिवसभरात महिला भाविकांची उपस्थिती मोठी होती, स्वतंत्र रांगांमुळे दर्शन घेणे शक्य झाले. श्रावणातील चारही शनिवारांचा एकूण विचार करता २० लाखांहून अधिक भाविकांनी मारुतीरायाच्या चरणी माथा टेकवला असल्याची माहिती मंदिराचे जनसंपर्क अधिकारी राजेंद्र जोंधळे यांनी दिली. गर्दीच्या काळात मंदिर परिसर आणि मार्गांवर पिण्याचे पाणी, स्वच्छता, आपत्कालीन वैद्यकीय सेवा आणि चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. पुरुष, महिलांसाठी दोन स्वतंत्र दर्शनरांगांची सोय शहराबाहेर पार्किंगसाठी स्वतंत्र व्यवस्था; पोलिसांकडून बंदोबस्त
Source link
भद्रा मारुतीचे 4 लाख भाविकांना दर्शन:भाविकांना दर्शनासाठी 1 तास, 10 क्विंटल साबुदाणा खिचडीचे करण्यात आले वाटप