![]()
मतदारयादी सखोल पुनरिक्षण कार्यक्रमात नावात विसंगती तसेच सन 2002 च्या मतदार यादीत नातेवाईकांच्या नावांमध्ये जुळवणी न झालेल्या 35 हजार मतदारांना निवडणूक विभागाने नोटीस पाठविल्या आहेत. आता या मतदारांची सुनावणी घेतली जाणार आहे. त्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने अधिकारी व कर्मचाऱ्यांची नुकतीच बैठकही घेतली आहे. हिंगोली जिल्ह्यात हिंगोलीसह वसमत व कळमनुरी विधानसभा मतदार संघात मतदार यादी सखोल पुनरिक्षण कार्यक्रम हाती घेण्यात आला होता. जिल्हाधिकारी राहुल गुप्ता, उपजिल्हाधिकारी प्रगती चोंडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सदरील काम पूर्ण करण्यात आले आहे. गावपातळीवर बीएलओ मार्फत या मतदारांचे अर्ज भरून घेण्यात आले आहेत. यामध्ये मतदारांचे सन 2002 च्या मतदार यादीतील आई, वडील, आजी, आजोबा यांच्या नावांशी जुळवणी करण्यात आली आहे. दरम्यान, हिंगोली जिल्ह्यात कायमस्वरुपी स्थलांतरीत, मॅपींग न होणे तसेच मृत झालेले सुमारे 85 हजार मतदार आढळून आले आहेत. त्यानुसार ता. 31 ऑगस्ट रोजी प्रारुप मतदार यादी प्रसिध्द करण्यात आली असून त्यानुसार यादीमध्ये ज्यांची नांवे नाहीत त्यांचे दावे व हरकती मागविण्यात आल्या आहेत. त्यांच्याकडून प्राप्त झालेल्या दावे व हरकतींवर सुनावणी होणार आहेत. यामध्ये जिल्ह्यात 17 हजार मतदारांचे स्वतंःचे नांवे सापडले नाही किंवा आई, वडील, आजी, आजोबा यांच्या नावाशी जुळवणी झाली नाही अशा मॅपींग न झालेल्या मतदारांची सुनावणी होणार आहे. या शिवाय मतदारांच्या नांव, जन्मतारीख, आई, वडीलांच्या नावात विसंगती असलेले 18 हजार मतदार असून त्यांची देखील सुनावणी घेतली जाणार आहे. त्यासाठी प्रशासनाकडून एकूण 35 हजार मतदारांना नोटीस पाठविण्यात आल्या असून ता. 30 सप्टेंबरपर्यंत सुनावणी घेतली जाणार आहे. त्यासाठी महसूल प्रशसान सज्ज झाले आहे. या पार्श्वभुमीवर जिल्हाधिकारी राहुल गुप्ता, निवडणूक उपजिल्हाधिकारी प्रगती चोंडेकर, निवासी उपजिल्हाधिकारी अभिमन्यू बोधवड, उपविभागीय अधिकारी विकास माने, प्रतिक्षा भुते, समाधान घुटुकडे यांच्या उपस्थितीत अधिकारी व कर्मचाऱ्यांची बैठक झाली. यावेळी आवश्यक त्या सुचना दिल्या आहेत. मतदारांनी आवश्यक कागदपत्रे सादर करावीत मतदारांना नोटीस प्राप्त झाल्यानंतर त्यांनी आवश्यक कागदपत्रे घेऊन मतदार नोंदणी अधिकारी यांच्याकडे उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हाधिकारी गुप्ता, उपजिल्हाधिकारी चोंडेकर यांनी केले आहे.
Source link
हिंगोलीत 35 हजार मतदारांना प्रशासनाकडून नोटिसा:नाव-नातेवाईकांच्या माहितीत विसंगती असल्याने होणार सुनावणी