.

गणेशोत्सवाच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत पाथर्डी तालुक्यात सोनोशी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत ‘माझा गणपती… माझ्या हाताने… पर्यावरणासाठी!’ या अभिनव संकल्पनेतून पर्यावरणपूरक गणेशमूर्ती निर्मिती कार्यशाळा घेण्यात आली. दिव्य मराठीच्या पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला प्रतिसाद देत श्री आनंद महाविद्यालय, पाथर्डी आणि शुभंकरोती ऑर्गनायझेशन यांच्या संयुक्त विद्यमाने झालेल्या या उपक्रमात इयत्ता पहिली ते दहावीतील विद्यार्थ्यांनी सहभाग घेत शाडूमातीच्या गणेशमूर्ती स्वतःच्या हाताने साकारल्या.
प्रा. सूर्यकांत काळोखे यांच्या मार्गदर्शनाखाली व जयश्री काळोखे यांच्या सहकार्याने झालेल्या कार्यशाळेत शुभ्रांश काळोखे, शुभम बांगर, तेजस बडे आणि सिद्धार्थ शिरसाट यांनी सहकार्य केले. प्रा. काळोखे यांनी प्लास्टर ऑफ पॅरिसऐवजी शाडूमातीच्या मूर्तींचा वापर, प्लॅस्टिकऐवजी कापडी पिशवी, पर्यावरण ऱ्हासाची कारणे आणि विद्यार्थ्यांची पर्यावरण संवर्धनातील भूमिका याबाबत मार्गदर्शन केले.
विशेष म्हणजे विद्यार्थ्यांना केवळ भाषणातून नव्हे, तर प्रत्यक्ष कृतीतून पर्यावरण शिक्षण देण्यात आले. माती मळण्यापासून मूर्तीला अंतिम आकार देण्यापर्यंत प्रत्येक टप्पा विद्यार्थ्यांकडून करून घेण्यात आला. त्यामुळे त्यांच्या सर्जनशीलतेला वाव मिळतानाच पर्यावरणाविषयी संवेदनशीलता आणि सामाजिक जबाबदारीची जाणीव निर्माण झाली. केंद्रप्रमुख अमोल कांबळे यांनी कार्यशाळेला भेट देऊन उपक्रमाचे कौतुक केले. गटशिक्षणाधिकारी सचिन राख आणि तालुका शा. पो. आ.अधीक्षक रामनाथ कराड यांनीही शाळेचे अभिनंदन केले.मुख्याध्यापक देविदास बडे यांच्या नियोजनाखाली शिक्षक बाबासाहेब खेडकर, अमोल भंडारी, नारायण दहिफळे आणि अण्णासाहेब साळुंके यांनी परिश्रम घेतले. उत्सव थांबवायचे नाहीत, तर उत्सव साजरे करण्याची पद्धत पर्यावरणपूरक करायची आहे,” हा संदेश देत ‘एक विद्यार्थी–एक पर्यावरणपूरक गणपती’चा आदर्श शाळेने निर्माण केला.