Headlines

ताजुद्दीन बाबा दर्ग्याच्या संदलमध्ये डीजेवर बंदी:प्यारे खान यांचे महाराष्ट्रातील सर्व दर्ग्यांना डीजे न वापरण्याचे आवाहन




नागपूर येथील जगप्रसिद्ध हजरत बाबा ताजुद्दीन औलिया यांच्या २६ व्या संदल उत्सवात डीजे वाजवण्यावर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. श्रद्धाळूंच्या सुरक्षेचा आणि धार्मिक पावित्र्याचा विचार करून हा निर्णय घेण्यात आला आहे. अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष आणि ताजुद्दीन बाबा ट्रस्टचे अध्यक्ष प्यारे खान यांनी ही माहिती दिली. त्यांनी सर्व भाविकांना यंदाच्या संदलमध्ये डीजे न आणण्याचे आवाहन केले आहे. प्यारे खान यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, कोणताही कायदा किंवा नियम एका धर्मापुरता मर्यादित नसतो. तो सर्व धर्मीय नागरिकांना समानपणे लागू होतो. याच सामाजिक आणि कायदेशीर जबाबदारीचे भान ठेवून महाराष्ट्रातील सर्व दर्ग्यांवरही डीजेचा वापर करू नये, अशी भूमिका त्यांनी मांडली. धार्मिक मिरवणुका किंवा जुलूसमध्ये डीजेच्या मोठ्या आवाजामुळे होणाऱ्या त्रासाबाबत अनेक मौलाना आणि मुस्लिम नागरिकांनी तक्रारी केल्या होत्या. इस्लाम धर्मातही डीजे किंवा गोंगाटाला प्रोत्साहन दिले जात नाही, असे प्यारे खान यांनी स्पष्ट केले. शांतता, संयम आणि धार्मिक शिस्त पाळणे हेच इस्लामचे मूळ तत्त्व आहे. त्यामुळे धार्मिक विधींचे पावित्र्य राखणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. या निर्णयाचा संदेश राज्यभरात पोहोचवण्यासाठी अल्पसंख्याक आयोग आणि ट्रस्ट विशेष प्रयत्न करणार आहे. महाराष्ट्रातील सर्व मौलाना, धार्मिक धर्मगुरू आणि मुस्लिम नेत्यांनी आपापल्या भागात यावर जनजागृती करावी, असे आवाहन प्यारे खान यांनी केले. डीजेला पर्याय म्हणून पारंपरिक आणि मर्यादित आवाजातील वाद्यवृंदांचा वापर करून उत्सवाचे पावित्र्य जपण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *