![]()
गणेशोत्सवात डीजेला परवानगी नको, असा कौल छत्रपती संभाजीनगरमधील नागरिकांनी दिला. ‘दिव्य मराठी’ने गेल्या दोन दिवसांत केलेल्या ऑनलाइन सर्वेक्षणात ६२.७ टक्के नागरिकांनी डीजेला परवानगी देण्यास विरोध दर्शवला आहे. रविवारी (६ सप्टेंबर) होणाऱ्या शांतता समितीच्या बैठकीतही डीजे बंदीवर शिक्कामोर्तब होणार आहे. डीजेवर बंदी घालण्याचा मुद्दा सध्या राज्यात गाजत आहे. पुण्यातील विद्यानंद बापट यांनी डीजेविरोधात घेतलेल्या भूमिकेला सर्वसामान्यांकडून प्रतिसाद मिळत आहे. या पार्श्वभूमीवर डीजे बंदीचा मुद्दा राज्यातील शहरांमध्ये चर्चेत आला आहे. नागपूरमध्ये पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी ३ सप्टेंबर ते १ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत मल्टिलेअर डीजे यंत्रणा, हाय-पॉवर डॉल्बी साउंड सिस्टिम, लेझर लाइट्स आणि प्रेशर-मिड सिस्टिमवर पूर्णपणे कडक निर्बंध लादले आहेत. सोलापूरमध्ये डीजे, डॉल्बी आणि लेझर लाइट्सच्या वापरावर बंदी जाहीर केली आहे. त्याचबरोबर मुंबई व कोल्हापूरमध्ये डीजे ध्वनी मर्यादेत वापरासाठी पोलिसांनी सूचना दिलेल्या आहेत. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर संभाजीनगरमध्ये रविवारी पोलिसांनी शांतता समितीच्या बैठकीचे आयोजन केले आहे. या बैठकीत डीजेच्या बंदीच्या निर्णयावर शिक्कामोर्तब केले जाईल. यापूर्वी गणेशोत्सव वगळता अन्य मिरवणुकांमध्ये डीजेचा वापर करण्यात आला होता. त्यावरून पोलिसांनी गुन्हेही नोंदवले आहेत. गेल्या वर्षी संभाजीनगरमध्ये गणेशोत्सव डीजेमुक्त साजरा केला होता. यंदाही डीजेमुक्त उत्सव साजरा करण्यात येणार आहे. असे केले सर्वेक्षण डीजे बंदीचा मुद्दा राज्यात गाजत आहे. याविषयी संभाजीनगरमधील रहिवाशांना काय वाटते, हे जाणून घेण्यासाठी ‘दिव्य मराठी’ने २ दिवसांत हे ऑनलाइन सर्वेक्षण केले. त्यासाठी क्यूआर कोडच्या माध्यमातून सर्वेक्षणाची प्रश्नावली उपलब्ध करून देण्यात आली. त्यामध्ये ‘यंदाच्या गणेशोत्सवात डीजे वाजवायला परवानगी द्यावी का?’ आणि ‘डीजेऐवजी पारंपरिक वाद्य, ढोल-ताशांना परवानगी द्यावी का?’ हे प्रश्न विचारण्यात आले होते.
Source link
62.7% संभाजीनगरवासीयांना डीजे नको:छत्रपती संभाजीनगरमध्ये शांतता समितीच्या बैठकीत आज डीजे बंदीवर होणार शिक्कामोर्तब