![]()
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंतरवाली सराटी येथे उपोषणास बसलेले मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा आठवा दिवस असून, त्यांची प्रकृती चिंताजनक बनली आहे. या पार्श्वभूमीवर शासनाने जरांगे पाटलांच्या मागण्यांवर तातडीने निर्णय घ्यावा, यासाठी शनिवारी जिल्ह्यातील गोलटगाव फाटा आणि गंगापूर शहरात सकल मराठा समाजाच्या वतीने तीव्र रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. गंगापूर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात मराठा समाजाने ४५ मिनिटे रास्ता रोको आंदोलन केले. यामुळे वैजापूर, मुंबई आणि नाशिककडे जाणारी वाहतूक पूर्णपणे खोळंबली. आंदोलनानंतर तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठवण्यात आले. हैदराबाद, सातारा व कोल्हापूर गॅझेटिअरच्या आधारे कुणबी नोंदींची अंमलबजावणी करून प्रमाणपत्रे व जात वैधता प्रमाणपत्रे वेगाने द्यावीत, सगेसोयरे अधिसूचनेवर तातडीने कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करावी, आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्यावेत, ११ सप्टेंबरपर्यंत मागण्या पूर्ण न झाल्यास मुंबईकडे कूच करण्याचा इशारा मनोज जरांगे यांनी दिल्याने, शासनाने वेळ न घालवता चर्चेतून तात्काळ तोडगा काढावा, अशी मागणी समाजबांधवांनी केली आहे. गोलटगाव फाट्यावर महामार्ग रोखला करमाडजवळील गोलटगाव फाटा येथे सकल मराठा समाजबांधवांनी एकत्र येत जालना-छत्रपती संभाजीनगर महामार्गावर ठिय्या मांडला. आंदोलकांनी शासनाच्या भूमिकेविरोधात घोषणाबाजी केली. या रास्ता रोकोमुळे महामार्गावरील दोन्ही बाजूंना वाहनांच्या रांगा लागून वाहतूक तासभर ठप्प होती. पोलिस निरीक्षक सम्राटसिंग राजपूत यांच्या नेतृत्वाखाली बंदोबस्त ठेवला होता.
Source link
मराठा आरक्षण:गंगापूरला 45 मिनिटे, गोलटगाव फाट्यावर एक तास रास्ता रोको, वैजापूर, मुंबई, नाशिककडे जाणारी वाहतूक खोळंबली