![]()
श्रीकृष्ण जन्माष्टमी तसेच माऊली संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या जन्माष्टमीनिमित्त पळसवाडी (ता. खुलताबाद, जि. छत्रपती संभाजीनगर) येथे आयोजित अखंड हरिनाम सप्ताहाची शनिवारी (५ सप्टेंबर) भक्तिमय वातावरणात उत्साहात सांगता झाली. सन १९५८ पासून सुरू असलेली ही ६८ वर्षांची अखंड धार्मिक परंपरा ग्रामस्थांनी यंदाही अत्यंत निष्ठेने जपली. २९ ऑगस्टपासून सुरू झालेल्या या सप्ताहात दररोज पहाटे काकडा भजन, सकाळी ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण, प्रवचन, सायंकाळी हरिपाठ आणि रात्री नामांकित कीर्तनकारांच्या कीर्तनसेवेचे आयोजन करण्यात आले होते. यामुळे संपूर्ण पळसवाडी आणि परिसर आध्यात्मिक वातावरणाने उजळून निघाला होता. सप्ताहादरम्यान आसाराम महाराज तिळवणीकर, विजय महाराज खेडकर, बाळकृष्ण महाराज दराडके, नारायण महाराज वाकळे, संदीपान महाराज, नारायणगिरी महाराज व विठ्ठल महाराज शिंदे यांची कीर्तनसेवा झाली. प्रवचनकारांनी भक्ती, संस्कार आणि सामाजिक एकतेचा मौलिक संदेश दिला. सप्ताहाच्या सांगता प्रसंगी देभेगाव येथील ढवळेश्वर संस्थानचे गुरुवर्य महंत ज्ञानदासजी महाराज यांचे काल्याचे कीर्तन पार पडले. त्यांच्या ओघवत्या व भक्तिमय शैलीतील कीर्तनाने उपस्थित भाविक मंत्रमुग्ध झाले. कीर्तनानंतर हजारो भाविकांसाठी भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. पळसवाडीतील या सप्ताहाला मोठा धार्मिक इतिहास लाभला आहे. १९५८ मध्ये सप्ताहाची सुरुवात होण्यापूर्वीही गावात गोकुळाष्टमीचा उत्सव साजरा होत असे. त्याकाळी बाहेरील गावांमधून येणाऱ्या दिंड्यांपैकी जी दिंडी प्रथम गावात पोहोचेल, तिच्या हस्ते दहीहंडी फोडली जात असे. पुढे या उपक्रमाला अखंड हरिनाम सप्ताहाचे मोठे स्वरूप प्राप्त झाले. यंदाच्या सोहळ्यात महिलांचा सहभाग विशेष उल्लेखनीय ठरला. धार्मिक कार्यक्रमांची पूर्वतयारी, अन्नदान व महाप्रसादाचे नियोजन आणि दैनंदिन उपक्रमांत महिलांनी मोलाचे योगदान दिले. हा सोहळा यशस्वी करण्यासाठी सप्ताह समिती, भजनी मंडळ, वारकरी सांप्रदाय, युवक व समस्त पळसवाडी ग्रामस्थांनी अहोरात्र परिश्रम घेतले. गेल्या सात दशकांपासून चालत आलेली ही परंपरा आजच्या तरुण पिढीला संस्कार आणि संघटन कौशल्याची प्रेरणा देत आहे.
Source link
पळसवाडी येथे जन्माष्टमीनिमित्त अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता:काल्याच्या कीर्तनानंतर भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ