![]()
ऑनलाईन कामांच्या अतिरेकाविरोधात प्राथमिक शिक्षकांनी असहकाराचा निर्धार केला आहे. त्याचाच एक भाग म्हणून आगामी १ डिसेंबरपासून अशैक्षणिक ऑनलाईन कामे न करण्याचा निर्णय घेण्यात आला असून सर्व प्रकारच्या प्रशासकीय व्हॉट्सॲप ग्रुपमधून बाहेर पडण्याचे ठरविण्यात
.
पुणे येथील शिक्षक भवनात पार पडलेल्या राज्यस्तरीय शिक्षक संघटनांच्या बैठकीत या निर्णयावर एकमत झाले. त्यानुसार जिल्ह्यातील मनपा, नगरपालिका, नगरपंचायती, जिल्हा परिषद यासांरख्या स्थानिक स्वराज्य संस्थांमधील शिक्षक १ डिसेंबरपासून कोणतेही अशैक्षणिक कामे करणार नाहीत. ऑनलाईन कराव्या लागणाऱ्या अशैक्षणिक कामांचा वाढता अतिरेक, प्रशासकीय व्हॉट्सॲप ग्रुपवरील वेळी-अवेळी येणारे संदेश आणि आदेश तसेच शासनाच्या शिक्षकविरोधी धोरणांच्या निषेधार्थ राज्यातील प्राथमिक शिक्षक संघटनांनी ही हाक दिली आहे. ऑनलाईन कामांमुळे विद्यार्थ्यांचे दैनंदिन अध्यापन प्रभावित झाले असून कामांच्या वाढत्या यादीमुळे मुख्याध्यापक आणि शिक्षक त्रस्त झाले आहेत. संचमान्यता धोरणाचे दुष्परिणाम, टीईटीबाबत शासनाची नकारात्मक भूमिका, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांचे अस्तित्व धोक्यात आणणारी धोरणे, शाळांच्या विविध अडचणी आणि शिक्षकांच्या मूलभूत प्रश्नांकडे शासनाकडून सातत्याने दुर्लक्ष होत असल्याची भावना यावेळी शिक्षक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली.
या प्रश्नांवर विविध शिक्षक संघटनांनी यापूर्वी आंदोलनेही केली. निवेदने आणि चर्चांच्या माध्यमातूनसुद्धा शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. मात्र, अद्याप कोणत्याही महत्त्वपूर्ण प्रश्नावर सकारात्मक निर्णय झालेला नसल्याने सर्व संघटनांनी एकत्र येऊन टप्प्याटप्प्याने आंदोलन उभारण्याचा निर्णय घेतला होता. त्याचेच प्रतिबिंब या आंदोलनाद्वारे दिसून येईल.
शासनाने अशैक्षणिक कामे न करण्याबाबत निर्णय घेतलेला असतानाही अनेक जिल्ह्यांमध्ये वेगवेगळ्या स्वरूपाची कामे शिक्षकांवर सोपवली जात आहे, या वास्तवाकडेही बैठकीत लक्ष वेधण्यात आले. त्यामुळे ‘शिक्षकांना शिकवू द्या, विद्यार्थ्यांना शिकू द्या!’ या प्रमुख घोषवाक्याला प्राधान्य देत सर्व संघटनांनी एकत्रित लढा उभारण्याचे ठरवले आहे. आगामी काळात नवा कृती कार्यक्रम आखून या लढ्यात सामाजिक संघटना, विद्यार्थी संघटना, पालक संघटनांनाही समाविष्ट केले जाणार आहे. शिवाय स्थानिक लोकप्रतिनिधींशी समन्वय साधून आंदोलनाची पुढील दिशासुद्धा निश्चित केली जाणार असल्याचे बैठकीत ठरविण्यात आले.
या आंदोलनात म.रा. प्राथमिक शिक्षक समिती, म. रा. प्राथमिक शिक्षक संघ (पाटील गट), महाराष्ट्राचे प्राथमिक शिक्षक संघ (थोरात गट), अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ, म.रा. प्राथमिक शिक्षक भारती संघटना, महाराष्ट्राचे पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटना, म.रा. पदवीधर व केंद्रप्रमुख शिक्षक संघटना, अ. भा. उर्दू शिक्षक संघटना, स्वतंत्र समता शिक्षक संघ, कास्ट्राईब शिक्षक संघटना, कास्ट्राईब शिक्षक महासंघ, डॉ. पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषद, महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना, प्रहार शिक्षक संघटना तसेच महाराष्ट्र राज्य दिव्यांग कर्मचारी व अधिकारी संघटना.