उपमुख्यमंत्री आणि पुण्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांच्यावर टीका केल्यानंतर दिलगिरी व्यक्त करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) आमदार रोहित पवार यांच्यावर भाजपचे प्रवक्ते अजित चव्हाण यांनी शुक्रवारी अत्यंत बोचऱ्या शब्दांत हल्लाबोल केल
.
“प्रसिद्धीसाठी हापापलेल्या रोहित पवारांनी आपल्या काकी सुनेत्रा वहिनी पवार यांच्याबाबत जे वक्तव्य केले आणि त्यानंतर त्यांना जो घुमजाव करावा लागला, त्यावरून महाराष्ट्राला एक ‘ज्युनिअर संजय राऊत’ मिळाला आहे असे म्हटले तर वावगे ठरू नये. मराठीत एक म्हण आहे—‘दोन हणा पण बाजीराव म्हणा’—तशीच रोहित पवारांची अवस्था झाली आहे. त्यांचा स्वतःचा पक्ष त्यांना विचारत नाही आणि यांची प्रसिद्धीची हाव काही थांबत नाही,” असा सणसणीत टोला अजित चव्हाण यांनी लगावला. यावेळी त्यांनी रोहित पवारांना ‘महाराष्ट्राचे ज्युनिअर संजय राऊत’ म्हणत त्यांच्या साखर कारखान्यांतील कामगारांच्या थकीत पगारावरून आणि शेतकऱ्यांच्या ऊस दरावरूनही जोरदार टीकास्त्र सोडले.
महाराष्ट्रात आधी 1 भोंगा होता, आता हा दुसरा ‘ज्युनिअर भोंगा’ उगवलाय!
प्रत्येक विषयावर पुढे येऊन प्रसिद्धी मिळवण्याच्या रोहित पवार यांच्या कार्यपद्धतीवर अजित चव्हाण यांनी खरमरीत शब्दांत निशाणा साधला. महाराष्ट्राला एकामागून एक वाचाळवीरांची परंपरा लाभते की काय, असे वाटायला लागले आहे. प्रत्येक विषयात ‘मीच बोलणार आणि मीच प्रसिद्धी मिळवणार’ अशी रोहित पवारांची वर्तणूक आहे. काल सुनेत्रा पवारांवर केलेल्या विधानातून त्यांना केवळ स्वतःच्या प्रतिमेवर प्रेम असल्याचे स्पष्ट दिसले.

संजय राऊतांप्रमाणेच स्वतःची पत घालवली
संजय राऊत यांनी बोलून बोलून आपला पक्ष घालवला; रोहित पवारांना तर त्यांचा पक्ष विचारतच नाही, पण बोलून बोलून ते स्वतःची पतही घालवत आहेत. महाराष्ट्रामध्ये आधी 1 भोंगा होता, आता हा दुसरा ‘ज्युनिअर भोंगा’ उगवला आहे, त्यामुळे मी त्यांना ‘महाराष्ट्राचा ज्युनिअर संजय राऊत’ अशी पदवी बहाल करतो, असे चव्हाण म्हणाले.
आधी चोपड्यातील कामगारांचे पगार आणि ऊस उत्पादकांना योग्य भाव द्या!
शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून सरकारवर टीका करणाऱ्या रोहित पवार यांच्या कारखानदारीचा पाढा वाचत अजित चव्हाण यांनी त्यांना खडेबोल सुनावले. 25 हून अधिक साखर कारखान्यांचे मालक असलेल्या रोहित पवारांनी आधी आमच्या चोपडा तालुक्यातील त्यांच्या कारखान्यावर काम करणाऱ्या कामगारांचे थकीत पेमेंट दिले पाहिजे. त्यांच्या कार्यक्षेत्रातील शेतकरी ऊस दरासाठी अक्षरशः टाहो फोडत आहेत; त्या शेतकऱ्यांना आधी नीट भाव द्या.
रक्ताची नाती आणि काकांचे उपकार विसरलात
स्वतः आलिशान ‘वेलफायर’ गाडीत मागेपुढे अंगरक्षकांचा ताफा घेऊन फिरायचे आणि दुसरीकडे शेतकऱ्यांचा कळवळा असल्याचा दिखावा करायचा, ही दुटप्पी भूमिका महाराष्ट्राला पटणारी नाही. राजकारण करताना किमान रक्ताची नाती जपावीत; ज्या काकांनी तुमचे राजकीय करिअर घडवले, त्यांनाही तुम्ही विसरलात, हे महाराष्ट्र कधीही विसरणार नाही, असा घणाघातही अजित चव्हाण यांनी केला.
—————————————————–
हेही वाचा…
पालकत्व आणि पालकमंत्री यातील फरक समजून घ्या: सुनेत्रा वहिनी मोठ्या भावाच्या पत्नी; भावना दुखावल्या असतील तर मी माफी मागते; सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया

उपमुख्यमंत्री आणि पुण्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांच्यावर आमदार रोहित पवार यांनी केलेल्या टीकेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) महिला आघाडीने पुणे व मुंबईत आंदोलनाचा इशारा दिला असतानाच, खासदार सुप्रिया सुळे यांनी शुक्रवारी (27 नोव्हेंबर) पत्रकार परिषदेत अत्यंत समंजस भूमिका घेत वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी