![]()
पैठण शहर व परिसरातील मराठा समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक विकासासाठी स्वतंत्र, प्रशस्त व सुसज्ज ‘मराठा भवन’ उभारण्यात यावे, अशी आग्रही मागणी मराठा समाजाच्या शिष्टमंडळाने आमदार विलास भुमरे यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. यासाठी शासकीय जागा उपलब्ध करून निधी मंजूर करावा, असे निवेदनात स्पष्ट केले आहे. पैठण शहराला मोठा ऐतिहासिक, धार्मिक व सांस्कृतिक वारसा असून या भागात मराठा समाजाची लोकसंख्या लक्षणीय आहे. विद्यार्थी, तरुण, महिला आणि सर्वसामान्य नागरिकांसाठी विविध उपक्रम राबवण्यासाठी शहरात कायमस्वरूपी हक्काची जागा असणे अत्यंत गरजेचे आहे. प्रस्तावित मराठा भवनात विद्यार्थ्यांसाठी आधुनिक अभ्यासिका, वाचनालय, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र, संगणक सुविधा तसेच युवकांसाठी रोजगार मार्गदर्शन केंद्र सुरू करण्याची मागणी करण्यात आली आहे. याशिवाय महिलांसाठी कौशल्य विकास केंद्र आणि सामाजिक कार्यक्रमांसाठी भव्य सभागृह उभारण्याची गरज व्यक्त करण्यात आली. या भवनासाठी शासकीय जागा निश्चित करून प्रकल्प अहवाल व अंदाजपत्रक तयार करावे आणि राज्य शासनस्तरावरून आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यासाठी पाठपुरावा करावा, अशी विनंती आमदारांना करण्यात आली. निवेदन देताना दादासाहेब पठाडे, विष्णू बोडखे, अनिल राऊत, साईनाथ कर्डिले, किशोर सदावर्ते, हरिभाऊ शेळके, ज्ञानदेव मुळे, महेश पवार, नारायण किरडे, प्रशांत देशमुख, प्रमोद आढाव, विठ्ठल वाघ, संतोष खराद व विशाल जाधव उपस्थित होते.
Source link
पैठणमध्ये ‘मराठा भवन' उभारण्याची केली मागणी